पारोळा, प्रतिनिधी । जळगाव येथील मेहरून परिसरातील एका नागरिकाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. शहरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान पारोळा शहरातील राजीव गांधी नगर मधील काही रस्ते नागरिकांनी पूर्णपणे बंद करून अनोळखी व्यक्तीला प्रवेश मिळणार नाही असे दांड्या बांबू बांधलेले दिसत आहे.
गेल्या आठ दिवसापासून संपूर्ण देशासह राज्यात लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. मात्र तरी काही नागरिक विनाकारणाने घराच्या बाहेर पडून आम्हाला काही होत नाही या गुर्मीमध्ये आहेत. जळगाव शहरात एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडताच शहरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आपल्या परिसरात अनोळखी व्यक्ती येऊ नये याची दक्षता रहिवाशांनी घेतली असून आपल्या भागात येणारे रस्ते काही ठिकाणी बंद करण्यात आलेले आहे. पारोळा शहरातील प्रभाग क्रमांक दोन राजीव गांधी नगरमध्ये तीन ते चार ठिकाणी बांबू व दांड्या नागरिकांनी बांधलेल्या दिसत आहे. या भागातील रस्ते नागरिकांनी पूर्ण बंद करून अनोळखी व्यक्तीला आत प्रवेश मिळणार नाही याची तजवीज राजीव गांधी नगर मधील नागरिकांनी केली आहे.