शेंदूर्णी, प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात लॉक डाउन असल्याने हातावर पोट असलेल्या मजुरांच्या चुली बंद पडू नये म्हणून अनेक मदतीचे हात धावून येत आहेत. शेंदूर्णी येथील श्वेतांबर जैन व्यापारी बांधवांनीही आपल्याकडे घरकाम करणाऱ्या महिलांना कामगारांना १५ दिवस पुरेल अश्या जीवनावश्यक किराणा सामानाचे आज वाटप केले.
घरकाम करणाऱ्या ६० महिलांना जैन श्वेतांबर स्थानकात शेंदूर्णी जैन श्वावक संघपती शांतीलाल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली सोशियल डिस्टन्सचे सर्व नियम पाळून जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित घरकाम करणाऱ्या महिलांना माजी सरपंच सागरमल जैन यांनी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाचे उपाय या विषयावर माहिती दिली. तसेच राज्यात लॉक डाउन असल्यामुळे दुकाने बंद आहेत अशा ही परिस्थितीत सर्व व्यापारी आपल्या कामगारांना घर बसल्या पगार देत आहेत. जैन श्वावक संघातील सर्व व्यापारी ठराविक वर्गणीकरून लवकरच राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत रक्कम पाठवून आपले योगदान देणार आहेत. आज घरकाम करणाऱ्या महिलांना तांदूळ, डाळ, तेल, साखर, चहा, मीठ, मिरची, स्नानाचा व कपड्याचा साबण, सर्फ पावडर, बिस्कीट पुडे, मसाला अश्या प्रकारचे पंधरा दिवस पुरेल असे साहित्य देण्यात आले. त्यानंतर गावातील गरीब गरजू कुटुंबांनापण मदतीचा हात देण्याचे नियोजन असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी कस्तुरचंद जैन, रमेश अनराज जैन, कांतीलाल जैन, उर्मील जैन, मंगेश जैन, बाळू जैन, शिवलाल राका व अन्य समाज बांधव उपस्थित होते.