जळगाव प्रतिनिधी । मेहरूण परिसरातील शेरा चौकातील एका घरात चोरट्यांनी डल्ला मारीत ११ मोबाईल, गॅस सिलेंडर व पाण्याची मोटार चोरून नेल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसांनी संशयित आरोपीस अटक केली.
अशी आहे घटना
शेरा चौकात वास्तव्यास असलेले इस्लाम शेख शाकीर शेख (३४) यांच्या पार्टीशनच्या खोली आपल्या कुटूंबीयांसह राहतात. मिस्त्री काम करून ते कुटूंबीयांचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या घराजवळ ओळखीचा सैय्यद वकार सैय्यद सलीम अली हा राहतो. त्याचा मोबाईल दुरूस्तीचा व्यवसाय आहे़ मोबाईल ना-दुरूस्त असल्यामुळे रविवारी रात्री ८ वाजता इस्लाम शेख यांनी सैय्यद वकार यांनी फोन करून मोबाईल दुरूस्ती करावयाचा आहे, असे सांगितले़ वकार याने त्यांना शेरा चौकात बोलविले नंतर मोबाईल पाहून सकाळी दुरूस्त करेल असे सांगितले़ त्याप्रसंगी सैय्यद वकार कुणाचा तरी फोन आला़ त्यांनी त्यांच्या हातात असलेली दहा मोबाईल ठेवलेली बॅग ही इस्लाम शेख यांना दिली व तुम्ही ही बॅग आणि तुमचा मोबाईल सकाळी दुकानावर घेवून येण्याचे सांगितले़ नंतर तो तेथून निघून गेला़
लाकडी फळी तोडून चोरट्यांचा प्रवेश
जेवन झाल्यानंतर शेख कुटूंबीय झोपलेले असताना मध्यरात्री चोरट्यांनी पार्टीशनच्या घराची फळी कापून घरात प्रवेश केला़ नंतर दुरूस्तीसाठी दिलेले दहा मोबाईलची बॅग, तसेच घरातील गॅस सिलेंडर आणि पाण्याची मोटार घेवून चोरटे पसार झाले़ सोमवारी सकाळी ७ वाजता इस्लाम शेख यांना जाग आल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला तर घराची लाकडी फळी कापलेली आढळून आली. नंतर घरात पाहणी केली असता ६१ हजार ५०० रूपये किंमतीचे ११ मोबाईल, अडीच हजार रूपये किंमतीचे गॅस सिलेंडर आणि ५ हजार रूपये किंमतीची पाण्याची मोटार असा एकूण ६९ हजार रूपये किंमतीचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी इस्लाम शेख यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयिताला मेहरूणमधून अटक
संशयित आरोपी वसीम कदीर पटेल रा. मास्टर कॉलनी, सुन्नी मश्जितजवळ हा संशयास्पद फिरत असल्याची गोपनिय माहिती गुन्हेशोध पथकाचे पोलीस नाईक इम्रान सय्यद यांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, मुदस्सर काझी, सचिन पाटील यांनी संशयित आरोपी वसीम याला मेहरूण परिसरातून अटक केली. त्याच्या ताब्यातील १२ मोबाईल, गॅस हंडी आणि एक टेक्स्मो कंपनीची पाण्याची मोटार हस्तगत केली.