भुसावळ, प्रतिनिधी । आपल्या संसाराला हातभार लावण्यासाठी उन्हातान्हाची पर्वा न करता शेतकरी महिला अत्यंत कष्टाची कामे करत असतात. रोज मातीत राबणाऱ्या शेतकरी महिलेचे मनोगत कवितेतून मांडावे असा विचार मनात आल्यानंतर शेतीमातीशी संबंधित कवितेत स्त्रीचे कष्ट पेरले आणि कवितेची निर्मिती झाली, असे प्रतिपादन बारावी युवकभारती मराठी पाठ्यपुस्तकातील “रोज मातीत” या कवितेच्या कवयित्री कल्पना दुधाळ यांनी केले.
बारावी युवकभारती मराठी भाषा अभ्यास मंडळ सदस्य डॉ. जगदीश पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या बारावी युवकभारती मराठी पाठ्यपुस्तकातील लेखक-कवी यांच्याशी ऑनलाईन संवाद या उपक्रमांतर्गत कवयित्री दुधाळ बोलत होत्या. प्रारंभी उपक्रम आयोजनाचा हेतू डॉ. जगदीश पाटील यांनी विशद केला. प्रा. माधुरी चौधरी भुसावळ यांनी कवयित्री दुधाळ यांचा परिचय करून दिला. त्यानंतर उपक्रमाचे समन्वयक प्रा. गणेश सूर्यवंशी जळगाव यांनी प्रश्नोत्तर व मुलाखतीच्या स्वरूपात कवयित्री कल्पना दुधाळ यांच्याशी संवाद साधला. तब्बल दीड तास सुरू असलेल्या या ऑनलाईन संवादात कवयित्री दुधाळ यांनी शेतीमातीशी असलेले नाते स्पष्ट केले. आषाढी एकादशी, डॉक्टर दिन व कृषी दिन अशा त्रिवेणी संगमावर पार पडलेल्या संवाद सत्रात कवयित्री दुधाळ म्हणाल्या की, शेतकरी कष्ट करतात तेव्हा हिरवेगार पीक शेतात डोलू लागते. “रोज मातीत” या कवितेतून शेतकरी महिला करत असलेले कष्ट तिच्या मनोगतातून व्यक्त झाले आहे. मीसुद्धा एक शेतकरी महिला असल्याने माझ्यासाठी शेतात जाणे हा रोजचाच दिनक्रम आहे. त्यामुळे शेतीमातीशी माझे घट्ट नाते आहे. “सिझर कर म्हणते माती” या कवितासंग्रहातील ही कविता असून वाचकांना खूप आवडली. तसेच “धग असतेच आसपास” या काव्यसंग्रहालाही चांगला प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांमध्ये शेती आणि शेतात राबणाऱ्यांविषयी संवेदनशीलता निर्माण व्हावी याहेतूने शिक्षकांनी प्रयत्न करावे, असेही आवाहन कवयित्री कल्पना दुधाळ यांनी केले. इझी टेस्टचे मुरलीधर भुतडा यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ. जगदीश पाटील यांनी तर आभार महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा. सुनील डिस्ले बारामती यांनी मानले. ऑनलाईन संवाद सत्रास जळगाव जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. मंजुषा क्षीरसागर यांच्यासह अभ्यास मंडळ सदस्य व महाराष्ट्रभरातील कनिष्ठ महाविद्यालयतील हजारो शिक्षक सहभागी झाले होते.