पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसह पाचोरा शहरातील नागरिकांच्या विविध समस्यांबाबत पाचोरा काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला असुन प्रशासनास जागे करण्यासाठी तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली १९ जुन रोजी सकाळी ११ वाजता शहरातील मच्छी बाजारपासून ते थेट प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत भव्य स्वरुपाचा “दणका मोर्चा” काढण्यात आला.
मच्छीबाजार येथुन निघालेला मोर्चा गांधी चौक, सराफ बाजार, जामनेर रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौकापासुन थेट तहसिल कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत आणण्यात आला. यावेळी उपस्थितांनी “महावितरण कंपनी हाय – हाय”, *शिंदे सरकार हाय – हाय”, “राहुलजी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है”, “नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी”, “पुरवठा विभाग हाय – हाय” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. याप्रसंगी शहर अध्यक्ष अॅड. अमजद पठाण, महिला जिल्हा उपाध्यक्षा संगिता नेवे, अॅड. मनिषा पवार, ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष इरफान मणियार, अमजद खान, कल्पेश येवले सह मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक, शेतकरी बांधव, काॅंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या कापसाला भाव देऊन शासकीय खरेदी केंद्र सुरू करा, पाचोरा व भडगांव तालुक्यातील उच्च तापमानात केळी / मोसंबी आदी फळ झाडाचे नुकसान भरपाई तात्काळ द्या, पाचोरा शहरात बाहेरपुरा भागात महावितरण विज कंपनीच्या मनमानी कारभाराने ईलेक्ट्रीक पोलवर मिटर बसवण्याचा प्रकार त्वरीत थांबवावा, बाहेरपुरा भागातील भुयारी गटारीचे अपुर्ण काम त्वरीत करण्यात यावे, बाहेरपुरा भागात असलेली हिंदु स्मशान भुमीच्या लगत असलेला भुखंड तात्काळ पेव्हर ब्लॉक बसवुन पार्किंगसाठी देण्यात यावा, नेरी ता. पाचोरा येथील शेतकऱ्यांसाठी फरशीचे
काम तात्काळ करण्यात यावे. पुरवठा विभागातील प्रलंबीत लाभार्थीना तात्काळ धान्य पुरवठा सुरू करावा, ऑक्टोंबर – २०२२ ते मार्च – २०२३ मोफत धान्य व विकत धान्यांची चैकशी करण्या यावी. या मागण्यांसाठी येथील काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली मच्छी बाजार ते प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत दणका मोर्चा काढण्यात आला.