जळगाव प्रतिनिधी । शेतकर्यांना अद्याप पीक विम्याची रक्कम मिळालेली नसून आपत्तीग्रस्त शेतकर्यांचे पंचनामे करून त्यांना मदत मिळण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही. या अनुषंगाने आज खासदार रक्षाताई खडसे यांच्या पुढाकाराने जिल्हाधिकार्यांसोबत बैठक घेण्यात आली. याप्रसंगी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी राज्यातील आघाडीचे सरकार हे प्रत्यक्षात पीछाडीवरचे असल्याची टीका केली.
खासदार रक्षाताई खडसे यांनी आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासोबत शेतकर्यांची बैठक घेऊन पीकविमा आणि शेतकर्यांना अपेक्षित असणारी नुकसान भरपाई याबाबत चर्चा केली. याप्रसंगी पत्रकारांशी बोलतांना खा. खडसे म्हणाल्या की, शेतकर्यांना पीक विम्याची रक्कम मिळाली नसल्याने ते खूप अडचणीत आहेत. यातच पीक विम्याचे निकष हे बदलत असून शेतकर्यांना याची नेमकी माहिती मिळत नसल्याने त्यांचे नुकसान होत आहे. याबाबत आपण संसदेत देखील प्रश्न उपस्थित केल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकर्यांची मोठ्या प्रमाणात हानी झाली असून त्यांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून त्यांना भरपाई मिळणे देखील आवश्यक असल्याचे रक्षाताई म्हणाल्या. तथापि, शेतकर्यांचे अद्याप नुकसानीचे पंचनामे देखील झाले नसल्याने याबाबत आपण प्रशासनाकडे पंचनामे करून भरपाईची मागणी केली असल्याची माहिती त्यांनी दिली. तर या प्रसंगी बोलतांना त्यांनी राज्य सरकार हे शेतकर्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला. राज्यात आघाडीचे नव्हे तर पीछाडीवरचे सरकार असल्याचा टोला त्यांनी याप्रसंगी मारला.
खालील व्हिडीओत पहा खासदार रक्षाताई खडसे नेमक्या काय म्हणाल्यात ते ?
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/344007563500906