शेंदूर्णी प्रतिनिधी । येथील नगरपंचायतमार्फत विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले आहे. यात १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून येथील बारी समाज मंगल कार्यालयात महिला शौचालय मंजूर करण्यात आले आहे. त्याचे भूमीपूजन पंडित दीनदयाळ पतसंस्था चेअरमन अमृत खलसे व संजय गायकवाड यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी बोलतांना अमृत खलसे यांनी सांगितले की, बारी समाज मंगल कार्यालयाच्या जागेत याआधी मंगल कार्यालय बांधकाम पूर्ण करण्यात आले असून अजूनही अनेक सोयीसुविधाचा अभाव आहे. त्यासाठी नगरपंचायतकडे उपलब्ध असलेल्या योजनांमधून सदरच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस असून इतरही समाजांसाठी सामाजिक सभागृह उभारून न्याय देण्याचा प्रयत्न नगरपंचायत नगराध्यक्षा विजया अमृत खलसे, उपनगराध्यक्षा चंदाबाई गोविंद अग्रवाल यांचा आहे. त्यासाठी सर्व नगरसेविका, नगरसेवक यांच्याकडून सहकार्य मिळत आहे. यावेळी बारी पंच मंडळाध्यक्ष नामदेव बारी यांनी नगरपंचायतने निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले. कार्यक्रमासाठी मुख्याधिकारी साजिद पिंजारी, नगर अभियंता भैय्यासाहेब पाटील, बारी समाज मंडळाध्यक्ष नामदेव विठ्ठल बारी, गंगाधर ढगे, लक्ष्मण बारी, त्र्यंबक बारी, रामदास बारी, अर्जुन बारी, नगरसेवक सतीश बारी, शरद बारी, शंकर बारी, योगेश बारी, प्रणव पाटील, संदीप पाटील, विलास अहिरे आदी उपस्थित होते.