शेंदुर्णी, ता. जामनेर प्रतिनिधी । येथे कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर जनता कर्फ्यूची हाक देण्यात आली असून आज याला पहिल्या दिवशी उत्स्फुर्त प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले. आज रस्ते ओस पडले असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली.
याबाबत वृत्त असे की, येथे आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पहुर पोलिस स्टेशनकडून शेंदूर्णी दुरक्षेत्रावर शांतता कमिटी सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी नागरिकांनी दिनांक १ जुलै रोजी आषाढी एकादशी असली तरी राज्यातील सर्वच मंदिरे बंद असल्याने शेंदूर्णी येथीलही सर्व मंदिरे बंद आहेत म्हणून कोणीही दर्शनासाठी येऊ नये असे आवाहन केले होते. पाच पेक्षा जास्त नागरिकांनी घोळक्याने फिरू नये व फिजीकल डिस्टन्सचे नियम पाळावे कामाशिवाय घराबाहेर पडू नये,मास्कचा वापर करावा,असे आवाहन मुख्याधिकारी साजिद पिंजारी, सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेशसिंग परदेशी, उपपोलिस निरीक्षक किरण बर्गे यांनी केले होते. तसेच शेंदूर्णीमध्ये कोरोना संसर्ग झालेले पाच रुग्ण गावात आढळून आल्याने चिंता व्यक्त करतांनाच जनता कर्फ्युचे आवाहन करण्यात आले होर्ते
या अनुषंगाने आज रविवार दिनांक २८ पासून जनता कर्फ्यू सुरू झालेला आहे. आज सकाळपासूनच कडकडीत बंद पाळण्यात आला. दुकानदारांना आवाहन करण्यासाठी नगराध्यक्षांचे पती अमृत खलसे, उपनगराध्यक्ष पती गोविंद अग्रवाल, राष्ट्रवादी शहराध्यक्ष रविंद्र गुजर, नगरसेवक निलेश थोरात, पत्रकार विलास अहिरे यांनी गावातून फेरफटका मारला. पोलीस तसेच नगरपालिका प्रशासनाच्या अधिकार्यांनीही कर्फ्यूचे पालन होते की नाही याकडे लक्ष ठेवले. दरम्यान, या कर्फ्यूला जनतेचे चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.