शेंदूर्णी, प्रतिनिधी । जिल्हा परिषद अंतर्गत येणारे येथील आयएसओ मानांकित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शिरपेचात काल महाराष्ट्र राज्य सरकारच्या आरोग्य खात्याने जाहीर केलेल्या कायाकल्प पुरस्काराने आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
कालच महाराष्ट्र राज्य आरोग्य सह संचालक यांच्याकडून शेंदूर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी कायाकल्प पुरस्कार घोषित करण्यात आला असल्याचा मेल प्राप्त झाला आहे. त्यानुसार प्राथमिक आरोग्य केंद्राला स्वच्छता व उत्कृष्ट रुग्णसेवा यासाठी २०००००/- दोन लाख रुपये रोख स्वरूपात पुरस्कार मिळाला असल्याचे येथिल प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल निकम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. शेंदूर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रास या आधीच आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे तसेच दोन वेळा आनंदीबाई जोशीं पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या आरोग्य केंद्रात वर्षाकाठी किमान ४०० गर्भवती मातांची सुरक्षित प्रसूती होत असतात तसेच कुटुंब नियोजनात सुध्दा प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्ह्यात आपला उच्चांक टिकवून आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्राची विजेची गरज सौरऊर्जा द्वारे भागविली जाते तसेच या आरोग्य केंद्रात रुग्णांना श्वान दंश,सर्प दंश,विंचू दंश या सारख्या लसी उपलब्ध असतात. कृष्ठरोग व क्षयरोग निर्मूलन यासाठी विशेष लक्ष दिले जाते. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास एकामागून एक मिळणारे पुरस्कार हे येथील कर्मचाऱ्यांचे सांघिक कार्य व रुग्ण कल्याण समितीच्या अध्यक्षा जिल्हा परिषद स्थायी समिती सदस्या सरोजिनी गरूड व त्यांचे सहकारी यांच्या मौल्यवान मार्गदर्शनाने शक्य झाल्याचे असल्याचे डॉ. राहुल निकम यांनी स्पष्ट केले आहे. कायाकल्प पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक प्राथमिक आरोग्य केंद्राची निवड जिल्हास्तरीय समितीचे वतीने कायाकल्प पुरस्कारासाठी दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार करण्यात येते त्यानुसार जिल्हास्तरीय समितीच्या पथकाने प्रत्यक्ष पाहणी केली. शेंदूर्णी प्राथमिक केंद्रातील स्वच्छता ,कचरा विल्हेवाट ,परिसर स्वच्छता, रुग्णांचे समाधान ,वृक्ष लागवड, कर्मचारी उपस्थिती व त्यांचे कार्य या गोष्टींचा अभ्यास करून १०० पैकी ८४ गुण दिले होते. त्यामुळे राज्य सरकार हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. पुरस्काराचे रकमेचा रुग्णांच्या सोयीसुविधा पुरविण्यासाठी उपयोग करण्यात येणार आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात नर्सिंग ट्रेनिंग सेंटर आहे. गर्भवती मातांसाठी लवकरच सूसज्ज प्रसूती गृह,ऑपरेशन थिएटर, तसेच कामगारांसाठी रुम बांधकाम करण्यात येणार असून निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली असल्याचे राष्ट्रवादीचे संजय गरूड यांनी सांगितले आहे. जामनेर उपजिल्हा रुग्णालय व पहुर ग्रामीण रुग्णालयात सुद्धा विविध आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी नविन इमारती उभारण्यात येणार आहेत त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे.