शेंदुर्णी प्रतिनिधी । कोराना विषाणूचा वाढते रूग्ण लक्षात घेतला शेंदुर्णी नगरपंचायतीने गरूड महाविद्यालयाच्या वसतीगृहात कोवीड केअर सेंटरची उभारणी केली आहे. याबाबत कोणतीही भिती न बाळगता प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी यांनी केले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपंचायतीने शेंदुर्णी सेकंडरी एज्यूकेशन संस्थेचे चेअरमन संजय गरूड यांच्या इमारतीत आयसोलेशन कक्षाची निर्मिती करण्याचा प्रस्ताव मांडला होता. महाविकास आघाडीच्या राज्य सरकारला मदत करण्यासाठी संस्था सदैव तयार असल्याचे सांगून क्वारंटाईन सेंटरसाठी महिला वसतिगृह इमारत तात्काळ नगरपंचायतीला देण्याचे मान्य केले. या इमारतीत आवश्यक सर्व सुविधा असून बेड व जेवण ह्या सुविधा नगरपंचायततर्फे पुरविल्या जाणार असल्याचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी सांगितले.
सदर कोविड केअर सेंटर हे शहारापासून १ किलोमीटर लांब असून मानवी वस्तीपासून ही लांब आहे. कोविड केअर सेंटर सर्वथा योग्य ठिकाणी आहे. शासनाच्या निर्देशाप्रमाणे सदर ठिकाणी केवळ कोरोना प्रादुर्भाव क्षेत्रांतून म्हणजेच मुंबई, पुणे कोरोना प्रादुर्भाव असलेल्या अन्य ठिकाणाहून तसेच एखाद्या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला असेल तर त्याच्या संपर्कात येणारे इतर निगेटिव्ह रुग्ण हे या कोविड केअर सेंटर मध्ये ठेवले जाणार आहे,कोविड केअर सेंटर मध्ये कोरोना पॉझिटिव्ह अहवाल असलेल्या कुठल्याही कोरोना रुग्णांना ठेवले जात नाही त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवून त्यांच्यावर उपचार केले जातात त्यामुळे शेंदूर्णीकर नागरिकांनी कोरोना केअर सेंटर विषयी कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता कुठल्याही प्रकारचे गैरसमज करून न घेता वस्तुस्थिती समजून घेऊन नगरपंचायत प्रशासनास सहकार्य करावे तसेच कोरोना प्रतिबंधासाठी सोशियल डिस्टन्सचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन मुख्याधिकारी यांनी केले आहे.