शिवाजीनगर रेल्वे पुलाच्या महत्वाच्या कामाला गती ( व्हिडीओ )

जळगाव संदीप होले । शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाच्या कामावर गर्डर टाकण्यात आले आहेत. यासाठी आज खास चार तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला. यामुळे आता या पुलाच्या कामाला गती मिळाल्याचे दिसून येत आहे.

जळगाव शहरातील शिवाजीनगर भागाकडे जाण्यासाठी नव्याने तयार करण्यात येणार्‍या रेल्वे पुलाचे काम आता महत्वाच्या टप्प्यावर आले आहे. गेल्या जवळपास दीड वर्षांपासून या पुलाचे काम सुरू असून आता याच्या सांगाड्यावर गर्डर टाकण्यास प्रारंभ झालेला आहे. आज पहाटे एक महाकाय गर्डर टाकण्यात आला असून दुपारी दुसरा गर्डर टाकण्यात आला आहे. गर्डर टाकण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आज चार तासांचा मेगा ब्लॉक घेतला. याच चार तासांमध्ये अगदी तातडीने गर्डर टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले.

गर्डर टाकण्यासाठी जळगावात महाकाय क्रेन्स आणि कुशल तंत्रज्ञांचा चमू दाखल झालेला आहे. या क्रेन्सच्या मदतीने गर्डर उचलून सांगाड्याच्या नियोजीत भागावर ठेवण्यात आले. शिवाजीनगर पुलाचे काम सुरू असल्याने पलीकडच्या भागात वास्तव्यास असणार्‍या हजारो नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. हा पूल लवकरात लवकर तयार व्हावा अशी मागणी अनेक वेळेस करण्यात आलेली आहे. आता गर्डर टाकण्याचे महत्वाचे काम पार पडल्यामुळे या पुलाच्या कामाला गती आल्याचे दिसून येत आहे.

तर, उर्वरित कामासाठी उद्या मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून नंतर कामाच्या आवश्यकतेनुसार ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. तर आजच्या मेगा ब्लॉकमुळे काही रेल्वे गाड्यांना विलंब झाला आहे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/461858121456415/

Protected Content