नांदेड, वृत्तसंस्था | काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापनेसंबंधी गौप्यस्फोट करताना घटनाबाह्य काम करणार नाही, असे शिवसेनेकडून लिहून घेतले असल्याचे म्हटले आहे. तसेच शिवसेनेने जर उद्देशिकेबाहेर काम केले तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. सोनिया गांधी यांचा तीन पक्षांच्या सरकारला विरोध होता. परंतु, आम्ही त्यांना राजी केले असेही यावेळी त्यांनी सांगितले. येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
“संविधानाच्या चौकटीतच सरकार चालले पाहिजे. संविधानाच्या चौकटीबाहेर बाहेर जायचे नाही आणि तसे झाले तर सरकारमधून बाहेर पडायचे, अशी कडक सूचना सोनिया गांधी यांनी दिली होती. याबाबत संपूर्ण माहिती उद्धव ठाकरे यांना देण्यात आली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी घटनेच्या बाहेर जाणार नाही, घटना हिच शिरोधार्य मानून घटनेच्या चौकटीत सरकार चालणार, अशी भूमिका घेतली. तसे त्यांनी लिहून दिले असल्यानेच सरकार स्थापन झाले आहे,” अशी माहितीही चव्हाण यांनी दिली.