धुळे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, धुळे आणि आर. सी. पटेल, इंन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट कॉलेज, शिरपूर यांचे संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्याचे 17 मार्च, 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता आयोजन करण्यात आले आहे. हर मेळावा आर. सी. पटेल, इंन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट कॉलेज, शिरपूर करवंद रोड, बालाजीनगर, शिरपूर येथे होणार आहे.
या रोजगार मेळाव्यामध्ये धुळे, नाशिक, औरंगाबाद, पुणे, मुंबई जिल्ह्यातील 10 उद्योगांचे नियुक्ती अधिकारी उपस्थित राहणार आहे. या मेळाव्यात येणाऱ्या पात्र उमेदवारांच्या चाचणी व मुलाखती घेऊन त्यांचेकडील विविध पदांच्या रिक्त जागांसाठी निवड करणार आहेत. तसेच स्वंयरोजगारासाठी आर्थिक सहाय्य करणारी शासनाची विविध महामंडळे यांचे स्टॉलही लावण्यात येणार असून कर्ज योजनांची माहिती व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या संधीचा जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा, तसेच रोजगार इच्छुक उमेदवारांनी याचा लाभ घेण्यासाठी किमान पाच प्रतीत बायोडाटा व फोटो आणि आधारकार्ड, सेवायोजन नोंदणीसह उपस्थित रहावे. नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. तसेच यापूर्वी महारोजगार वेबपोर्टलवर नोंदणी केली असल्यास संकेतस्थळावर आपला 15 अंकी नोंदणी क्रमांक टाकून लॉगीन करावे आणि मोबाईल व आधार क्रमांक पडताळणी करावी.
त्याचबरोबर भरती इच्छुक नियोक्ते यांनी जास्तीत जास्त रिक्तपदे www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर Dhule job fair-4 (2022-23) यावर नोंदणी करावी. याबाबत काही अडचण आल्यास सहाय्यासाठी कार्यालयाच्या 02562-295341 या दूरध्वनीवर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा. किंवा www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर मुखपष्ठावरील उजव्या भागातील खालील बाजुस उपलब्ध असलेल्या Rojgar Chat Helpline या सुविधेचा उपयोग करावा. या मेळाव्यास जास्तीत जास्त भरती इच्छुक नियोक्ते आणि बेरोजगार उमेदवारांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा. असे आवाहन राजू. नि. वाकुडे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, धुळे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.