शिक्षण अधिकाऱ्याच्या कथित लाचखोरीच्या चौकशीत जबाब नोंदवले

 

जळगाव- प्रतिनिधी । चाळीसगावच्या तीन शिक्षकांकडून बदलीसाठी  जिल्हा परिषदेचे तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी दीड लाखांची लाच घेतल्याच्या चौकशीत आज उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे  यांच्यासमोर जाब जबाब घेऊन साक्ष नोंदवण्यात आले.

आज तत्कालीन शिक्षणाधिकारी यांनी दांडी मारली आहे तर पुढील सुनावणी ही २ नोव्हेंबर रोजी होणार आहे. चाळीसगाव तालुक्यातील तीन शिक्षकांनी बदल्यांसाठी अर्ज सादर केले होते. परंतु, बदलीसाठी त्यांच्याकडून तत्कालीन शिक्षणाधिकार्‍यांनी  पैसे मागितलेे. संबंधित तीन शिक्षकांनी देखील शिक्षणाधिकार्‍यांना पैसे दिले  मात्र   तरीही बदली न झाल्याने  या शिक्षकांनी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे धाव घेऊन दाद मागितली. त्यानंतर आमदार चव्हाण यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केल्याने संबंधित अधिकार्‍यांनी तीनही शिक्षकांचे पैसे परत केले आणि त्यानंतर बदलीही करण्यात आली होती.

तक्रारदार रवींद्र शिंदे यांनी यासंदर्भात शिक्षण संचालकांकडे तक्रार केली होती. त्यावरुन शिक्षण संचालकांनी जिल्हा परिषदेला चौकशी करण्यासंदर्भात पत्र पाठविले होते. जि.प.सीईओ डॉ.बी.एन.पाटील यांनी एक सदस्यीय समिती नियुक्त करुन सामान्य प्रशासन विभागाचे  उपमुख्यकार्यकारी कमलाकर रणदिवे यांच्याकडे चौकशीची जबाबदारी सोपविली आहे.

या चौकशी समितीने तक्रारदार, तीन शिक्षक, शिक्षणाधिकारी, पत्रकार आणि साक्षीदार आदींची चौकशी करुन संबंधितांचा जबाब नोंदविण्यात येणार होता. मात्र, या एक सदस्यीय समितीसमोर शिक्षणाधिकारी व पत्रकार यांनी दांडी मारली आहे. आता शिक्षक व तक्रारदार यांनी काय जबाब नोंदविले याबाबत उत्सुकता आहे.

Protected Content