मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सध्या सुरू असलेल्या घडामोडी पाहता भविष्यात शिंदे गटाचे अस्तित्व पुसले जाणार असल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.
सध्या भाजप-सेना युतीत जागा वाटपावरून वादंग सुरू झाल्याचे दिसून येत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कालच आपला पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत २४० जागा लढविणार असल्याचे प्रतिपादन केल्याचे तीव्र प्रतिक्रिया उमटली. त्यांनी आज याबाबत घुमजाव करत आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा केला. मात्र यातून दोन्ही पक्षांमध्ये सारे काही आलबेल नसल्याचा संदेश गेला आहे. यावरच आज जयंत पाटील यांनी भाष्य केले आहे.
आज या संदर्भात पत्रकारांशी बोलतांना जयंत पाटील म्हणाले की, भाजप आणि शिंदे गटात वाद सुरू आहेत. शिंदे गटाची ताकद अशी देखील मर्यादीत प्रमाणात आहे. यातच भारतीय जनता पक्ष हा आपल्या सहकारी पक्षाचे अस्तित्व पुसण्यासाठी ओळखला जातो. याच प्रमाणे आगामी काळात शिंदे गट हा भाजपमध्ये विलीन होईल. त्यांचे अस्तित्व पूर्णपणे पुसले जाईल असे भाकीत जयंत पाटील यांनी याप्रसंगी केले.