“शासन आपल्या दारी” हा उपक्रम चळवळ म्हणून राबवा : पालकमंत्री

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम अधिकारी व कर्मचारी यांनी समन्वयाने यशस्वी करण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्येक घटकांपर्यंत पोहचवण्यासाठी सर्व मिळून एक जुटीने काम करूया आणि “शासन आपल्या दारी” उपक्रम चळवळ समजून राबवा असे आवाहन आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते धरणगावातल्या हेडगेवार नगरातील जी.एस. मंगल कार्यालयात आयोजीत ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी बोलत होते.

 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अमन मित्तल तर प्रमुख उपस्थितांमध्ये विविध शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात १५ एप्रिल २०२३ ते १५ जून २०२३ या दोन महिन्यात तालुक्यातील विविध शासकीय योजनांच्या १८१८९ लाभार्थ्यांपैकी प्रातिनिधीक स्वरूपात २५७ लाभार्थ्यांनापालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या हस्ते लाभाचे वाटप करण्यात आले.

 

राज्य शासनाने ‘शासन आपल्या दारी’ हा अतिशय महत्वाकांक्षी आणि सर्वमान्य जनतेच्या हितासाठी उपयुक्त ठरणारा उपक्रम मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी जाहीर केला आहे. आज धरणगावातील हेडगेवार नगरातल्या जी. एस. मंगल कार्यालयात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते शासन आपल्या दारी उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अमत मित्तल होते.

 

यांची होती प्रमुख उपस्थिती

 

यावेळी उपस्थितांमध्ये  प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड, तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, गटविकास अधिकारी सुशांत पाटील , नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते, तालुका कृषी अधिकारी प्रदीप चव्हाण, नगरपालिकेच मुख्याधिकारी जनार्दन पवार, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख पी. एम. पाटील, तालुका प्रमुख गजानन पाटील, भाजप विधानसभा क्षेत्रप्रमुख चंद्रशेखर अत्तरदे, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, भाजपाचे तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, नगरपालिकेचे अधिकारी संजय मिसर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. छाया बोरसे, तालुका निबंधक विशाल ठाकूर, महावितरणचे सुनील रेवतकर, वर्ड व्हिजनचे जितेंद्र गोरे, मंडल कृषी अधिकारी किरण देसले,  मंडळ अधिकारी भरत पारधी आदींची उपस्थिती होती. तर या कार्यक्रमाला ई-सेवा केंद्रचालक; तालुक्यातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विकासो पदाधिकारी, विद्यार्थी, पालक विविध लाभार्थी, तालुक्यातील सर्व तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, यांच्यासह महिला बचत गट, पंचायत समिती व नगरपालिका अधिकारी आणि कर्मचारी, लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

प्रास्ताविक तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी केले. यात त्यांनी सर्वसामान्य लोकांची कामे गतीने होण्यासाठी शासन आपल्या दारीचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी आपल्या मनोगतातून शासकीय यंत्रणेने लोकल्याणकारी योजनांचे लाभ हे सर्वसामान्यांना मिळवून देण्यासाठी जाणवपूर्वक प्रयत्न करावेत असे आवाहन केले.

 

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आपल्या भाषणातून म्हणाले की, शासनाने जनहिताच्या अनेक योजना अंमलात आणल्या असल्या तरी १००% याची अंमलबजावणी होत नाही. नागरिकांना अगदी साध्या दाखल्यांपासून ते विविध योजनांसाठी सरकारी खात्यांकडे चकरा माराव्या लागतात. यामुळे शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना थेट विविध योजनांचा तात्काळ लाभ मिळणार आहे. जिल्ह्यात ७५ हजार लाभार्थ्यांना थेट लाभ या माध्यमातून देण्यात येणार असून याचा आज तालुका पातळीवर शुभारंभ झाला आहे. लवकरच जिल्हा स्तरावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.

 

दोन महिन्यात तब्बल १८१८९ लाभार्थी !

 

शासन आपल्या दारी या उपक्रमात १५ एप्रिल २०२३ ते १५ जून २०२३ या दोन महिन्यात तालुक्यातील महसूल विभाग, पंचायत समिती, नगरपालिका, आरोग्य , महावितरण, कृषी विभाग, व वर्ल्ड व्हिजन फाऊंडेशन अंतर्गत एकूण १८१८९ विविध योजनेखालील लाभार्थ्यांना विवधि योजनेखाली लाभ मंजूर करण्यात आले आहेत. आज यातील प्रातिनिधीक स्वरूपत पालकमंत्र्यांच्या हस्ते २५७ लाभार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले.  यात महसूल विभागात एकूण ८२३० लाभार्थ्यांमध्ये श्रावणबाळ, संजय गांधी निराधार, कुटुंब लाभ, जात प्रमाणपत्र, इतर प्रमाणपत्रे, पोटखराब प्रकरणांचे प्रमाणपत्र, रेशनकार्ड, निवडणूक ओळखपत्र आदींचा समावेश होता. पंचायत समितीच्या अंतर्गत ३०७७ लाभार्थ्यांमध्ये  जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, नमुना ८-अ आणि विवाह प्रमाणपत्र, शबरी आवास योजना, दारिद्रयरेषेखाली प्रमाणपत्र, वैयक्तीक शोषखड्डे, गोठे बांधकाम, सिंचन विहिरी, बायोगॅस बांधकाम, वैयक्तीक शौचालय, यांचा समावेश होता.

 

नगरपालिका अंतर्गत ४८३ योजना लाभार्थ्यांमध्ये जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, प्रधानमंत्री आवास योजना, दिव्यांगांना लाभ, बचतगटांना एन.ओ.सी. आदींचा समावेश होता. आरोग्य विभागामार्फत पाच लाख रूपयांपर्यंतच्या लाभासाठी आरोग्य खात्याचे गोल्डन कार्ड तर महावितरण कंपनीतर्फे ३० नवीन वीज जोडणी प्रदान करण्यात आली. कृषी विभागामार्फत फळबाग, ठिबक, यांत्रीकीकरण व आत्मागट असे ७८२ लाभार्थी होते. यासोबत वर्ल्ड व्हिजन एनजीओच्या माध्यातून ५५८६ विद्यार्थ्यांना बुट व बॅग वितरण, विद्यार्थ्यांना बुट, बॅग व गणवेश वितरण, कुटुंबांना फळांच्या झाडांचे वितरण आणि शासकीय योजनांची माहिती पुस्तक वितरण करण्यात आले. बचत गटांना धनादेश वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला विविध स्टॉल लावण्यात आले होते. एप्रिल ते जूनपर्यंत मंजूर करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

 

सूत्रसंचालन मंडल कृषी अधिकारी किरण देसले यांनी केले. तर  आभार नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते यांनी मानले.

Protected Content