जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ‘कोरोना महामारीच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना पासून आमचा जीव वाचविला. सारे जग अगतिक असताना आम्हाला भयमुक्त ठेवले.’ भावाने केलेल्या बहिणीच्या रक्षणाच्या या उदात्त भावनेने महिलांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टरांना राखी बांधून अनोखे रक्षाबंधन साजरे केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोरोना महामारीच्या काळामध्ये शुभांगी रितेश वाणी व शीतल सागर वाणी या कोरोना महामारीची लागण झाल्यामुळे ॲडमिट होत्या. प्रसंगी रुग्णालयात कोरोनामुळे भीतीचे वातावरण होते. मात्र पूर्ण रुग्णालयात भयमुक्त वातावरण ठेवून निस्वार्थ भावनेने उपचार करून आमच्यासह अनेक रुग्णांचा डॉक्टरांनी जीव वाचविला. भावाने बहिणीचे रक्षण केले अशी उदात्त भावना ठेवून शुभांगी वाणी आणि शितल वाणी यांनी गुरुवारी. ११ ऑगस्ट रोजी अनोखे रक्षाबंधन साजरे केले.
सुरुवातीला अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना राखी बांधून त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. त्यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात औषध वैद्यकशास्त्र विभागाचे डॉ. विशाल आंबेकर व डॉ. विपिन खडसे यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. प्रसंगी डॉक्टरांनी दोन्ही भगिनींचे आभार मानत, ‘रुग्णालय तुमचेच आहे, कधीही वैद्यकीय मदत लागली तर जरूर या‘ असे सांगितले.
यावेळी डॉ. प्रथमेश पाटील, डॉ.प्रतीक्षा मुळे, डॉ.करण चत्तर, जनसंपर्क अधिकारी विश्वजीत चौधरी, राज्य परिचारिका संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयश्री जोगी, औषध निर्माण अधिकारी रितेश वाणी, संदीप माळी आदी उपस्थित होते.