शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात म. फुले जनआरोग्य योजनेचा सात दिवसात ३० जणांना मिळाला लाभ

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात राज्य शासनाच्या गरजू रुग्णांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना सुरु करण्यात आली आहे. गेल्या सात दिवसात तब्बल ३० रुग्णांना योजनेचा लाभ मिळाल्यामुळे रुग्णांसह नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे ५ एप्रिल २०२० पासून कोरोना रुग्णांसाठी अधिग्रहित करण्यात आले होते. गेल्या आठवड्यात १७ डिसेंबर पासून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या आदेशानुसार व प्रशासक डॉ. बी.एन. पाटील यांच्या सूचनेनुसार अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी कोरोनाविरहित ओपीडी व वैद्यकीय सेवा सुरु केली आहे. योजनेचे कार्यालय मुख्य गेट क्रमांक १ च्या आवारात मध्यवर्ती भागात आल्यामुळे रुग्णांची चांगली सोय झाली आहे. राज्यातील दारिद्रयरेषेखालील (पिवळी शिधापत्रिका धारक) आणि दारिद्रयरेषेवरील (केशरी शिधापत्रिका धारक) कुटुंबांना अधिक चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने महाराष्ट्र राज्य सरकारने म. फुले जनआरोग्य  योजना सुरू केली आहे. अशा कुटुंबांना अधिक दर्जेदार वैद्यकीय सेवा प्राप्त होण्याच्या दृष्टीने ही योजना जळगावमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुरु झाली आहे.

कोरोना विरहित रुग्णालय सुरु झाल्यावर महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेमधून बुधवारी २३ डिसेंबरपर्यंत ७ दिवसात १६ कोरोना विरहित रुग्णांनी योजनेचा लाभ घेतला आहे. यामध्ये किडनी विकार, अपघाताचे रुग्ण, गर्भवती महिला, क्षयरोग, जनरल सर्जरी, हर्निया, हृदयरोग, विषबाधा अशा आजारांच्या १६ रुग्णांचा समावेश आहे. तर १४ कोरोना आजाराने ग्रस्त रुग्णांना देखील लाभ झाला आहे. योजनेचे अध्यक्ष डॉ. मारुती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार, नोडल अधिकारी डॉ. आलोक यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी माधुरी पाटील, अभिषेक पाटील, आरोग्यमित्र दीपक पाटील हे रुग्णांसह नातेवाईकांना सहकार्य करून माहिती देत आहेत. अधिक माहितीसाठी नोडल अधिकारी डॉ. आलोक यादव (८१२३१७२९०१) यांना संपर्क करावा असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातर्फे करण्यात आले आहे.

Protected Content