जळगाव, प्रतिनिधी । सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या अनुसूचित जाती उपयोजनांची (विशेष घटक योजना) जिल्ह्यात व्यापक प्रमाणात प्रचार व प्रसिध्दी व्हावी. याकरीता सामाजिक न्याय विभागाच्यावतीने एलईडी व्हॅनद्वारे चित्ररथ बनविण्यात आला आहे. या चित्ररथास आज जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी हिरवी झेंडी दाखविली.
याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील आदिसह जिल्हाधिकारी कार्यालय व समाजकल्याण विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जातीतील नागरीकांसाठी पद्मश्री दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, कन्यादान योजना, रमाई आवास योजना, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, छत्रपती राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार योजना, मागासवर्गीय मुलामुलींकरीता शासकीय वसतीगृहे योजना आदि योजनांची माहिती तसेच या योजनांच्या लाभार्थ्यांच्या मुलाखती एलईडी व्हॅनद्वारे नागरीकांना बघावयास व ऐकावयास मिळणार आहे.
हा चित्ररथ जळगाव जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांमधील अनुसूचित जातीची अधिक लोकसंख्या असणाऱ्या 246 गावांमध्ये जाणार असून या चित्ररथाच्या माध्यमातून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजनेची जिल्हाभर प्रचार व प्रसिध्दी करण्यात येणार आहे.