पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील शेळावे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला लागून असणार्या विद्युत पोल आणि ताराला सुरक्षा कवच बसविण्यात आले आहे.
गेल्या तीन चार वर्षापासुन पावसाळ्याच्या अगोदर वादळ वारे, गारपीट, झाडाच्या फांदया तार व पोलवर पडुन वीज वाहक पोल व त्याला दिलेला ताण हे लोखंड या धातुचे असल्याने त्यात तांत्रिक बिघाड निर्माण होवुन वीज प्रवाह उतरतो. गावात व शेतात अशा पोलला व ताणाला अनावधानाने स्पर्श होवुन अनेकांना विजेचा धक्का बसला आहे. असाच वीज वाहक पोल व ताण अगदी लागुन जि. प. उच्च प्राथ शाळा दगडी सबगव्हाण शाळेत मागच्या महिन्यात शिक्षण परीषदेला उपस्थित असलेल्या धाबे शाळेचे राज्य शिक्षक मनवंतराव साळुंखे यांच्या लक्षात आला. तेव्हाच त्यांनी ठरविले की बाल सुरक्षा म्हणुन या पोलला व ताणला काहीतरी ठराविक उंची पर्यंत सुरक्षा कवच बसवायचे. शाळेच्या मुख्याध्यापिका रत्ना भदाणे, पदविधर शिक्षक गिरीश वाणी, रत्नाकर पाटील, हितेंद्र तावडे, प्रतिभा वाडीले, प्रतिभा पाटील यांनी आपल्या परीने त्या पोलला सुरक्षित करण्याचा प्रयत्न व तो पोल इतरत्र हलविण्याची विनंती करणारा पत्र व्यवहार ग्राम पंचायत व महावितरणशी केलेला होता.
दरम्यान, त्यांनी सध्या घरी आलेले आपले मित्र गौरव शिंपी-गवांदे, विद्युत सहाय्यक मंचर पुणे ( पारोळाकर ) यांच्याशी चर्चा केली व त्या पोलला प्लास्टिक पाईपचे सुरक्षा कवच बसविण्याचा विचार व संकल्पना सांगितली. गौरव गवांदे महावितरणातच असल्याने त्यांना या गोष्टीची गरज व महत्व माहित असल्याने याबाबत येणारा सर्व खर्च करून शाळेवर पाईप नेऊन हे सुरक्षा कवच बसविण्याची इच्छा व्यक्त केली. त्या नुसार शिक्षक व जाणकार ग्रामस्थांच्या मदतीने ते बसविण्यात आले. या उपक्रमाचे कौतुक होत असून यावेळी गांवाचे सरपंच नंदलाल पाटील , शेळावे केंद्र प्रमुख जितेंद पवार, राज्य शिक्षक मनवंतराव साळुंखे , शाळा व्यवस्थापन अध्यक्ष छोटु पाटील , शाळेतील सर्व शिक्षक व अनेक ग्रामस्थ बंधु बघिनी उपस्थित होते. यावेळी गावा कडुन गौरव गवांदे यांचा हार्दिक सत्कार करण्यात आला. केंद्र प्रमुख जितेंद्र पवार यांनी मनवंतराव साळुंखे व गौरव गवांदे यांच्या या बाल सुरक्षा उपक्रमाचे कौतुक करुन याच प्रकारे लोक सहभागातुन असे सुरक्षा कवच बसविण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन केले .