जळगाव प्रतिनिधी । शहरातील सिग्नेट फाऊंडेशनच्या इंग्रजी शाळेत कागदपत्रांमध्ये फेरफार करून फसवणूक केल्याचे उघड झाल्यानंतर संबंधित विभागाला तक्रार दिल्याच्या रागातून आठ जणांनी शाळेच्या संस्था चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, मनिष रमेश कथुरिया (वय-५१) रा. मेहरूण तलावजवळ, शिरसोली रोड यांचे सिग्नेट फाऊंडेशन नावाची संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून सिग्नेट हायस्कूल नावाची इंग्रजी शाळा आहे. या शाळेत संशयित आरोपी विकास मनिलाल बहादुसिंग परिहार आणि संजय मनिलाल बहादुसिंग परीहार रा. भगीरथ कॉलनी, गणेश कॉलनीजवळ यांनी शाळेच्या व्यवस्थापनाचे महत्वाचे दस्तऐवजमध्ये फेरफार करून स्वयंघोषीत अध्यक्ष केले. दरम्यान ही माहिती मनिष कथुरिया यांना माहित पडल्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार केली. या रागातून परीहार बंधुसह इतर सहा जणांनी ४ जानेवारी रोजी सकाळी ७ ते ११ वाजेच्या सुमारास मनिष यांच्या घरी येवून शिवीगाळ व मारहाण केली. तसेच घरातील ५६ हजार रूपये रोख, १६ हजार रूपांचा डीव्हीआर, ७ हजार रूपयांचा इंटरनेट हब, व बँकेचे सही केलेले कोरे चेक असा एकुण ७९ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल घेवून पसार झाले. यात मनिष हे जखमी झाले. खासगी रूग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांनी २२ जानेवारी रोजी सायंकाळी एमआयडीसी पोलीसात धाव घेतली. विकास परिहार आणि संजय परिहार यांच्यासह इतर ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी करीत आहे.