शाळांच्या ५० मीटर्स परिसरात जंक फूडवर बंदी

नवी दिल्ली वृत्तसंस्था । विद्यार्थ्यांच्या आरोग्य रक्षणासाठी भारतीय खाद्य सुरक्षा आणि गुणवत्ता प्राधिकरणाने (FSSAI) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शाळेच्या 50 मीटर परिसरात जंक फूडच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. FSSAI चे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण सिंघल यांनी शाळा आणि इतर शैक्षणिक संस्थांच्या परिसरातील जंक फूड आणि आरोग्यासाठी हानिकारक असलेल्या पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली आहे.

एफएसएसएएआयने शाळेच्या परिसरातील 50 मीटरपर्यंत विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी घातक असलेल्या खाद्यपदार्थांची विक्री व जाहिरातींवर बंदी घातली आहे. शालेय मुलांच्या सुरक्षिततेसाठी आणि पौष्टिक आहाराच्या दृष्टीने हे पाऊल उचलले गेले आहे. एफएसएसएआय अन्न सुरक्षा आणि मानक कायद्यानुसार नवीन तत्त्वे लागू झाले आहे. शालेय मुलांसाठी सुरक्षित, पौष्टिक आणि दर्जेदार आहार देणे हा त्याचा हेतू आहे

शाळेतील मुलांना यामुळे सुरक्षित अन्न आणि संतुलित आहार मिळेल. जंक फूडमध्ये आरोग्याला अपायकारक असणाऱ्या अनेक गोष्टींचा समावेश असतो. त्यामुळेच शाळेच्या परिसरात 50 मीटरपर्यंत याची विक्री आता करता येणार नाही. या जंक फूडमध्ये साधारण पिझ्झा, बर्गर, कोल्डड्रिंक, चिप्स, फ्रेंच फ्राईज, समोसा, पेस्ट्री, सँडविच, ब्रेड पकोडे इत्यादींचा समावेश आहे.

2015 मध्ये दिल्ली हायकोर्टाने एफएसएसएएसआयला शाळेच्या कँटीनमध्ये जंक फूडच्या विक्रीवरील नियम घालण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर, प्राधिकरणाच्या तज्ज्ञ समितीने शाळांमधील मुलांसाठी निरोगी अन्न पुरवण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे तयार केली. शाळेत कँटीन सुरू करण्यासाठी एफएसएसएआय कडून परवाना घ्यावा लागेल. मुलांना सुरक्षित, चांगले भोजन मिळावे यासाठी शाळेच्या जागेची नियमित तपासणीही पालिका अधिकारी व राज्य प्रशासन करणार आहे.

Protected Content