मुक्ताईनगर, प्रतिनिधी | शालेय पोषण आहार योजना जास्तीचे मनुष्यबळ नसताना योग्य पद्धतीने राबवूनसुद्धा मुख्याध्यापकांची बदनामी होत असल्याने तसेच त्यांचा संबंध नसताना नोटीस बजावण्यात आल्याने सदरच्या योजनेची जबाबदारी स्वतंत्र यंत्रणेकडे सोपवण्यात यावी, अशी मागणी मुक्ताईनगर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघातर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात असे म्हटले आहे की, शासनाच्या नियमानुसार इयत्ता पहिली ते आठवी वर्गातील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजना राबवत असताना शाळास्तरावर अनेक अडचणी येतात. त्या सर्व अडचणी मुख्याध्यापक आपल्या स्तरावर सोडवतात. परंतु काही दिवसांपासून शालेय पोषण आहार पुरवठा करणाऱ्या पुरवठादारातर्फे (फेडरेशनतर्फे) तांदूळ व धान्य आदी वेळेवर प्राप्त होत नाही. आल्यास पुरवठा कधी कमी तर कधी जास्त असतो. प्रशासनाच्या सूचनेनुसार तशी पावतीवर गोल खूण करून किती माल घेतला, तसे नोंदविण्यात येते व रेकॉर्डनुसार गटशिक्षणाधिकारी तसेच शालेय पोषण आहार अधीक्षक यांच्यामार्फत तपासणी केली जाते. अशाप्रकारे सर्व रेकॉर्ड बरोबर असतानासुद्धा तालुक्यातील काही मुख्याध्यापकांना त्यांचा काही संबंध नसताना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. यामुळे मुख्याध्यापकांची नाहक बदनामी झाली असून त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती ढासळत आहे. त्यामुळे अशा घटनेचा आम्ही निषेध करीत असून शा.पो.आ. योजना चांगल्याप्रकारे राबवून सुद्धा बदनामी होत असल्यास ते यापुढे का चालवावी ? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
सदर योजना राबविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी, अशी मागणी मुख्याध्यापक संघातर्फे करण्यात आली असून याबाबतचे निवेदन मुक्ताईनगर तालुका गटशिक्षणाधिकारी यांच्यातर्फे केंद्रप्रमुख राजू तडवी यांनी स्वीकारले. याप्रसंगी मुक्ताईनगर तालुक्यातील मुख्याध्यापक एन. आय. पाटील, पी.पी. दाणे, ए.के. सूर्यवंशी, डी.के. पाटील, एन.एस. पोपे, एस.एस. पाटील, आर. जे. कौलकर, एस.डी. ठाकूर, व्ही.एस. चौधरी, सौ.एस.एच. भोई, एन.एस. पवार, एन. पी. भोम्बे, संदीप पाटील, आर.एस. पाटील, एन.डी. काटे, आर.पी .पाटील, एस.डी .पाटील, के.एन. चौधरी, आय.आय. शाह, पी.डी. महाजन आदी मुख्याध्यापकांसह उपशिक्षक डी.एम. फेगडे, महेंद्र तायडे, आर.के .पाटील आदी उपस्थित होते.