जळगाव, प्रतिनिधी । महाराष्ट्र शारीरिक शिक्षण तंत्रस्नेही पॅनल निर्मित शारीरिक शिक्षण ई कंटेंटचा समावेश दीक्षा अॅपमध्ये करून शासनातर्फे चालविल्या जाणाऱ्या जिओ चॅनलवरून राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यत पोहचविले जाईल असे प्रतिपादन राज्याचे शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी शारीरिक शिक्षण ई कंटेंट ऑनलाईन शुभारंभ प्रसंगी केले.
शारीरिक शिक्षण हे कोरोना काळात फक्त विद्यार्थीच नव्हे तर शिक्षक, पालक व समाज यांच्यात रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. शारीरिक शिक्षणास इतर विषयापासून दूर करू शकत नाही . पण संचमान्यतेत हे पद आज अडचणीत जरी असले तर संचमान्यनेचे निकष बदलण्याचे विचार चालू असून शारीरिक शिक्षणाला संचमान्यतेत लवकरच घेऊ असे पाटील यांनी सांगितले. यावेळी महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचालनालयाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, सहायक क्रीडा संचालक सुहास पाटील, जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षीत यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोरोना काळात शाळा बंद पण शिक्षण सुरू आहे. विविध विषयांचे ऑनलाईन शिक्षण शासनाच्या निर्देशानुसार सुरू आहे यात शारीरिक शिक्षणाचा समावेश नाही. परंतु, कोरोना काळात रोग प्रतिकारक शक्ती वाढीसाठी शारीरिक शिक्षण गरजेचे असून त्यासाठी महाराष्ट्र शारीरिक शिक्षण तंत्रस्नेही पॅनल तयार करण्यात आले त्यांना सात दिवसाचे ऑनलाईन प्रशिक्षण संघटनेमार्फत मोफत देण्यात आले या माध्यमातून शारीरिक शिक्षणाचे विविध ई कंटेंट व अभ्यासक्रमावर आधारित विविध व्हिडीओ तयार करण्यात आले आहेत. ते प्रत्येक शाळा, विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविले जाणार आहे. अभ्यासक्रम निर्मिती व कार्यवाही याविषयीची सविस्तर माहिती राज्य क्रीडाशिक्षक महासंघाचे अध्यक्ष व तंत्रस्नेही प्रमुख राजेंद्र कोतकर यांनी दिली .
प्रास्ताविक उपाध्यक्ष आनंद पवार यांनी केले. यावेळी महाराष्ट्र क्रीडाशिक्षक महासंघाचे वरिष्ठ सहसचिव राजेश जाधव, बालभारती शारीरिक शिक्षण अभ्यासक्रम मंडळाचे सदस्य राजेंद्र पवार यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी तंत्रस्नेही शिक्षक रोहित आदलिंग व घनश्याम सानप (अहमदनगर), प्रा लक्ष्मण चलमले (रायगड), जयदीप सोनखासकर (अकोला), प्रा. चंद्रकांत पाटील (पुणे), दत्तात्रय मारकड (सिधुदुर्ग), सचिन देशमुख (नागपूर), लक्ष्मण बेल्लाळे (लातूर), सुनीता नाईक (कोल्हापूर), सुवर्णा देवळाणकर यांनी प्रात्यक्षिकसह माहिती दिली. याप्रसंगी क्रीडा धोरण समिती सदस्य अविनाश ओंबासे, माध्यमिक व उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षण महामंडळाचे सहसचिव शिवदत्त ढवळे, मुबंई मनपा शारीरिक शिक्षक युनिटचे कार्यवाह डॉ. जितेंद्र लिंबकर, शारीरिक शिक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष विश्वनाथ पाटोळे, राज्य क्रीडा विकास परिषदेचे सचिव ज्ञानेश काळे, शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाचे सचिव चांगदेव पिंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. ऑनलाईन शुभारंभ कार्यक्रम यशस्वी आयोजनासाठी विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाणचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, स्टेप इन्फोटेक प्रा.लिमिटेडचे संचालक प्रशांत खिलारी यांचे तर गणेश म्हस्के व बाळासाहेब कोतकर यांचे तांत्रिक सहकार्य लाभले. या ऑनलाईन कार्यक्रमांची माहिती क्रीडाशिक्षक महासंघाचे वरिष्ठ सहसचिव राजेश जाधव यांनी ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’ला दिली.