जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील नूतन मराठा महाविद्यालय येथे तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय हिंदी परिषदेचे दि. २८ ते ३० डिसेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. यासोबत अखिल भारतीय हास्य व्यंग काव्य संमेलनदेखील आयोजित करण्यात आले आहे. हिंदी भाषिक प्रेमी तसेच रसिकांनी परिषदेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख यांनी केले आहे.
येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या नूतन मराठा महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त तसेच भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय हिंदी परिषदेचे आयोजन २८ ते ३० डिसेंबर दरम्यान महाविद्यालयात करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी २८ रोजी दुपारी २ वाजता परिषदेचे उद्घाटन छत्तीसगड राजभाषा आयोगाचे माजी अध्यक्ष तसेच प्रसिद्ध साहित्यिक, समीक्षक डॉ.विजयकुमार पाठक यांच्या हस्ते होणार आहे.
प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे मानद सचिव निलेश भोईटे आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ईकरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. करीम सालार उपस्थित राहणार आहेत. सुप्रसिद्ध व्यंग समीक्षक डॉ. सुरेश माहेश्वरी यांचे बीज भाषण होणार आहे. उद्घाटनानंतर २८ रोजी संध्याकाळी पाच वाजता आंतरराष्ट्रीय हास्य व्यंग संमेलन होणार आहे. यामध्ये सुप्रसिद्ध कवी डॉ. परमेश्वर गोयल, सुभाष काबरा, घनश्याम अग्रवाल, विठ्ठल पारीख, डॉ. ब्रजेश सिंह, डॉ. ए के यदु यांचेसह इटालियन कवयित्री अतिचे देफ्लेरियान यांची उपस्थिती राहणार आहे. देशभरातून विविध साहित्यिकांची तसेच कवींची उपस्थिती लाभणार आहे. रसिकांनी तसेच हिंदी भाषा प्रेमींनी परिषदेला व संमेलनाला उपस्थिती द्यावी असे आवाहन मुख्य संयोजक प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख, संयोजक डॉ.राहुल संदानशिव यांनी केले आहे.