वॉशिंग्टन: वृत्तसंस्था ।. कोरोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी प्रयत्न व संशोधनही करण्यात येत आहे. शहरातील प्रदूषण विशेषत: नायट्रोजन डायऑक्साइडच्या संपर्कात अधिक काळ राहिल्यामुळे हा विषाणू अधिक घातक ठरू शकतो, असा दावा एका संशोधनात करण्यात आला आहे.
इनोवेशन जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनात हा दावा करण्यात आला आहे. अमेरिकेतील ३१२२ काउंटीमध्ये जानेवारी ते जुलै दरम्यान प्रदूषक पीएम २.५, नायट्रोजन डायऑक्साइड आणि ओझोन यांचे विश्लेषण करण्यात आले. अमेरिकेतील इमोरी विद्यापीठाचे डोंगहाय लियांग यांनी सांगितले की, अल्पकाळ आणि दीर्घकाळ प्रदूषणाच्या संपर्कात आल्यानंतर मानवाच्या शरीरावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रभाव हा ऑक्सिडेटीव दबाव आणि श्वास संक्रमणाच्या धोक्याच्या रुपात आढळतो.
वायू प्रदूषणाच्या प्रदूषक आणि कोविड-१९ मधील तीव्रतेचा संबंध शोधण्यासाठी संशोधकांनी बाधितांचा मृत्यू आणि लोकसंख्येनुसार बाधितांच्या होणाऱ्या मृत्यू दराचा अभ्यास केला. बाधितांचा मृत्यू व नायट्रोजन ऑक्साइड यांच्यात घनिष्ठ संबंध असल्याचे आढळले. हवेत नायट्रोजन डाय ऑक्साईडच्या वाढीमुळे अनुक्रमे ११.३ टक्के बाधितांचा मृत्यू आणि १६.२ टक्के मृत्यू दर वाढला आहे. हवेतील नायट्ऱोजन डायऑक्साइडचे प्रमाण कमी केल्यास बाधितांचे प्राण वाचवता येऊ शकतात असे संशोधकांनी म्हटले आहे.