मुंबई : वृत्तसंस्था । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शऱद पवार यांना पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विट करत ही माहिती दिली त्यांच्यावर छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली.
मंगळवारी संध्याकाळी शरद पवारांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून २१ दिवसांतील ही तिसरी शस्त्रक्रिया आहे.
याआधी ३० मार्चला पित्ताशयात खडे झाल्याने शरद पवार यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना सात दिवसांच्या विश्रांतीचा सल्ला दिला होता. १२ एप्रिलला पित्ताशयावरील शस्त्रक्रियेसाठी ते पुन्हा ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल झाले होते.
नवाब मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आमच्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार काल संध्याकाळी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात पित्ताशयावरील शस्त्रक्रियेनंतर पुढील प्रक्रियेसाठी दाखल झाले. प्रक्रिया पार पडली असून त्यांची प्रकृती सुधारत आहे”.