शरद पवार यांच्या पश्चिम बंगालमधील प्रचाराची उत्सुकता

 

नवी दिल्ली: वृत्तसंस्था । पश्चिम बंगालच्या रणसंग्रामात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार  हे उतरणार आहेत. 1 एप्रिलपासून तीन दिवसांसाठी ते बंगालमध्ये फिरून प्रचार करतील. मात्र, ते तृणमूल काँग्रेसच्या व्यासपीठावरून प्रचार करणार का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

 

शरद पवार यांनी तृणमूल काँग्रेससाठी प्रचार केल्यास ममता बॅनर्जी यांना फायदा मिळू शकतो. तर काँग्रेस पक्षासाठी हा धक्का ठरेल.

 

काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते प्रदीप भट्टाचार्य यांनी शरद पवार यांना पत्र लिहून बंगालमध्ये प्रचाराला येऊ नये, अशी विनंती केली होती. ‘राजद’चे नेते तेजस्वी यादव यांनाही काँग्रेसकडून असेच पत्र पाठवण्यात आले होते. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचा लढा हा सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाशी आहे. तुमच्यासारखे स्टार प्रचारक तृणमूल काँग्रेसच्या व्यासपीठावर गेले तर सामान्य मतदारांच्या मनातील संभ्रम वाढेल. त्यामुळे आपण तृणमूल काँग्रेसच्या प्रचारात ममता बॅनर्जी यांच्या बाजूने उतरू नये, असे भट्टाचार्य यांनी पत्रात म्हटले होते. मात्र, शरद पवार यांनी काँग्रेसची ही विनंती अमान्य केल्याचे स्पष्ट होत आहे.

 

 

ममता बॅनर्जी यांच्यासाठी पश्चिम बंगालची लढाई कधी नव्हे इतकी अटीतटीची झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचासारखा खंदा नेता आणि भाजपच्या अवाढव्य प्रचारयंत्रणेचा सामना करण्यासाठी ममता बॅनर्जी यांना राष्ट्रीय स्तरावरील मोदीविरोधकांची साथ मिळण्याची गरज आहे. त्यासाठी भाजपला कात्रजचा घाट दाखवणाऱ्या शरद पवार यांच्यासारख्या नेत्याचा ममता बॅनर्जी यांना प्रचारात फायदा होऊ शकतो.

 

शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकासआघाडीचा भाग आहे. यामध्ये काँग्रेस पक्षाचाही समावेश आहे. त्यामुळे शरद पवार पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचा विरोधक असणाऱ्या तृणमूलच्या प्रचारास गेल्यास ही बाब काँग्रेस नेत्यांना खटकू शकते.

 

दुसरीकडे तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाची (राजद) बिहारमध्ये काँग्रेसशी युती आहे. गेल्यावर्षीची विधानसभा निवडणुकीही दोन्ही पक्षांनी एकत्र लढवली होती. त्यामुळे तेजस्वी यादवही युतीधर्माच्या बंधनात अडकलेले आहेत.

 

मात्र, आगामी काळात राष्ट्रीय स्तरावरील समीकरणे जुळवायची असतील तर पश्चिम बंगालमध्ये भाजप विरोधकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. ही तिसऱ्या आघाडीची नांदी ठरू शकते. मात्र, आता काँग्रेसच्या भूमिकेमुळे यामध्ये खोडा घातला जाण्याची शक्यता आहे.

Protected Content