मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि माजी मंत्री फौजिया खान आज राज्यसभेसाठी अर्ज दाखल करणार आहेत.
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सात जागांसाठी २६ मार्चला निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख शुक्रवार १३ मार्च आहे. संख्याबळानुसार महाविकास आघाडीचे चार, तर भाजपचे तीन उमेदवार निवडून येऊ शकतात. राष्ट्रवादी दोन तर काँग्रेस-शिवसेना प्रत्येकी एक जागा लढवणार आहे. दरम्यान, शरद पवार यांचा राज्यसभा कार्यकाळ एप्रिल महिन्यात पूर्ण होत असून त्यांच्यासह माजिद मेमन यांचाही कार्यकाळ पूर्ण होत आहे. मात्र यावेळी मेमन यांचा जागी फौजिया खान यांना संधी देण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे.