शरद पवार – उद्धव ठाकरे भेटीबद्दल संजय राऊत यांचा खुलासा

 

मुंबई : वृत्तसंस्था । “शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली मुख्यमंत्री दिल्लीत पंतप्रधानांना भेटणार आहेत त्यासंबंधी चर्चा झाली,” असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. त्यांनी मराठा आरक्षणावर  नक्कीच तोडगा निघेल असा विश्वासही व्यक्त केला

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेटली घेतली. सोमवारी रात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये चर्चा पार पडली. रात्री उशिरापर्यंत ही बैठक सुरु होती अशी माहिती एकनाथ  शिंदे यांनी दिली आहे.  यावेळी बैठकीत नेमकी काय चर्चा झाली यासंबंधी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

 

“महाराष्ट्रातील प्रत्येक नेत्याला मराठा आरक्षणाचा विषय ताणला जाऊ नये असं वाटत आहे. मराठा, ओबीसी असे अनेक विषय असून प्रत्येकाने आपल्या प्रश्नासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. तसं झाल्यास महाराष्ट्रात वातावरण गढूळ होईल, तणाव निर्माण होईल,” अशी भीती संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.

 

 

“महाराष्ट्र कोरोनाशी लढत असून हा सर्व विषय केंद्राच्या अख्त्यारित आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मराठा आऱक्षण विषय केंद्राच्या अख्त्यारित गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत जाऊन इतक्या मोठ्या समाजाचं नेतृत्व करुन केंद्र सरकाच्या दरबारात प्रश्न मांडणं कर्तव्य आहे. हा गंभीर विषय असून मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत. त्यातून तात्काळ मार्ग काढा असे सांगण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाण दिल्लीत पोहोचले आहेत. मोदींना ते ठामपणे सांगतील,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

 

संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांवर केलेल्या टीकेलाही उत्तर दिलं. सामना संपादकीयमध्येही याच विषयावरुन टीका कऱण्यात आली असून ते पत्र चोरण्यास कारण काय? अशी विचारणा संजय राऊत यांनी केली आहे. “पत्र चोरल्याचा आरोप भाजपाने केला आहे. ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा जुनी जळमटं काढून फेकून द्यायला हवी होती. पण भाजपाचे सहकारी त्यातून बाहेर पडलेले नाहीत. त्यांच्या मनाला हा विषय फार लागला आहे,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

 

“चोरीचा माल विकत घेणं हा सुद्धा गुन्हा आहे. एखाद्या नेत्याने शरद पवारांच्या ड्रॉवरमधून पत्र चोरलं असेल तर त्या त्याच्या आधारे सरकार स्थापन करणं आणि चोरीचा माल विकत घेणं हा फार मोठा गुन्हा आहे,” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

 

भाजपा नेत्यांनी शिवसेनेने विश्वासघात केल्याची टीका केली असून यावर बोलताना ते म्हणाले की, आम्हालाही विश्वासघात केल्यानंतर वाईट वाटतंच. उद्धव ठाकरेंना भाजपाच्या प्रमुख नेत्यांनी शिवसेना प्रमुखांच्या खोलीत मुख्यमंत्रीपदाबाबत शब्द दिला होता असं उद्धव ठाकरे म्हणतात. तो शब्द पाळला गेला नाही हा विश्वासघात असून अनैतिक आहे. ती वेदना आजही टोचत आहे. पण आम्ही विसरुन गेलो आहे. त्यामुळे भाजपानेसुद्धा पत्र, शिवसेनेने फसवलं यातून बाहेर पडलं पाहिजे आणि एक विरोधी पक्ष म्हणून खंबीर नेतृत्व उभं करुन काम केलं पाहिजे”.

 

Protected Content