शरद पवारांनी राज्य सरकारलाही एखादं पत्र लिहून मदतीची मागणी करावी : फडणवीस

मुंबई (वृत्तसंस्था) केंद्र सरकारने मोठे आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. इतर राज्यांनीही त्या त्या राज्यात आर्थिक पॅकेज दिले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारलाही एखादं पत्र लिहून मदतीची मागणी करावी, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावत राज्य सरकारने आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी केली आहे.

 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन शेतकरी आणि बाराबलुतेदारांच्या प्रश्नांबाबतचे निवेदन दिले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचा शेतमाल घरीच पडून आहे. शेतमाल खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारने पैसे देऊनही राज्य सरकारने हा माल खरेदी करण्यासाठी कोणतीही व्यवस्था केलेली नाही. हाताला काम नसल्याने बाराबुलतेदारांवरही मोठं आर्थिक संकट उभं राहिलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने या बाराबलुतेदारांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. दरम्यान, देशातील अडचणीत असलेल्या साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने भरीव मदत करावी अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहले होते. यावरूनही फडणवीस यांनी शरद पवारांनी राज्य सरकारलाही एखादं पत्र लिहून मदतीची मागणी करावी, असे टोला लगावला आहे.

Protected Content