व्यापारी संकुलातील एकल दुकाने सुरू करावी ; जिल्हा व्यापारी महामंडळाची महापौर, आयुक्तांकडे मागणी

 

जळगाव (वृत्तसंस्था) उच्च न्यायालयाने एका प्रकरणात कोरोना काळात व्यापारी संकुलातील मुख्य रस्त्यावर असलेली एकल दुकाने उघडण्याचे आदेश दिले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार जळगाव जिल्ह्यात देखील व्यापारी संकुलातील एकल दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी अशी मागणी जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळातर्फे महापौर भारतीताई सोनवणे व आयुक्त सतिष कुलकर्णी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

 

मिशन बिगीन लॉक ओपन अंतर्गत शासनाने काही अटींच्या अधीन राहून दुकाने उघडण्यास मुभा दिलेली आहे. दरम्यान, व्यापारी संकुलात असलेल्या मुख्य रस्त्यावरील दुकाने उघण्यास प्रशासनाकडून मनाई करण्यात येत आहे. मुंबई येथे उच्च न्यायालयात एका व्यावसायिकाने याबाबत याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात व्यापारी संकुलातील मुख्य रस्त्यालगत असलेली एकल दुकाने उघडण्यास मुभा दिलेली आहे. उच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत घेऊन जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्त सतिष कुलकर्णी व महापौर सौ.भारती सोनवणे यांना निवेदन सादर केले. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष विजय काबरा, सचिव ललित बरडीया, कार्याध्यक्ष सुरेश चिरमाडे आदी उपस्थित होते.

 

जळगाव जिल्ह्यातील मुख्य रस्त्यालगत असलेली सर्व दुकाने उघडण्यास उच्च न्यायालयाच्या निकालास अधीन राहून परवानगी देण्यात यावी अशी मागणी जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाच्यावतीने करण्यात आली. आयुक्त सतिष कुलकर्णी यांनी सदर निवेदन तात्काळ मेलद्वारे शासनाकडे पाठविण्यात येईल असे आश्वासन देऊन शासनाकडून परवानगी मिळताच दुकाने उघडण्यास परवानगी देऊ असे सांगितले. महापौर सौ.भारती सोनवणे यांनी मनपाच्या विधी अधिकाऱ्यांकडून यावर मत मागविण्याचे सुचविले. जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाकडून निवेदन जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांना देखील देण्यात आले आहे.

Protected Content