जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मोबाईलवर बोलण्याचा बहाणा करत, तसेच मोबाईल नंबर लिहून घेण्यासाठी पेन घेवून असे सांगत चोरट्याने वॉचनमचा त्याच्या डोळ्यादेखत मोबाईल घेवून पोबारा केल्याची घटना जळगाव शहरातील रिंगरोड परिसरातील प्रताप नगर येथे समोर आली आहे. याप्रकरणी रविवार १२ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव शहरातील रिंगरोड परिसरात प्रताप नगरात, गोकूळ स्विट मार्ट चौकात राजेंद्र पुंडलिक चव्हाण यांचे मालकीचे नवीन बांधकाम सुरु आहे. याठिकाणी वॉचमन म्हणून दिपक नानू पवार वय ४२ हा कामाला आहे. रविवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास बांधकामाच्या ठिकाणी एक अनोळखी इसम आला. वॉचमन दिपक पवार याला त्याच्या मालकाचा व सुपरवायझरचा फोन नंबर मागितला. त्यानंतर बोलण्यासाठी वॉचमन दिपककडून त्याचाही मोबाईल सुध्दा घेतला. याचदरम्यान फोन नंबर लिहण्यासाठी पेन घेवून असे सुध्दा अनोळखी व्यक्तीने वॉचमन दिपक यास सांगितले. दिपक पेन घ्यायला गेला असता, अनोळखी व्यक्ती वॉचमन दिपक याचा ८ हजार रुपये किंमतीचा मोबाईल घेवून पसार झाला. दिपक पवार बाहेर आल्यानंतर त्यांनी संबंधित अनोळखी व्यक्तीचा शोध घेतला, मात्र तो कुठेही दिसून आला नाही, अखेर आपली फसवणूक करुन चोरट्याने मोबाईल चोरुन नेल्याची खात्री झाल्यावर रात्री ११ वाजेच्या सुमारास वॉचमन दिपक पवार याने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन अनोळखी व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस नाईक पल्लवी मोरे ह्या करीत आहेत.