जळगाव, प्रतिनिधी । हैद्राबाद येथील वैज्ञानिक डॉ. अलका निलेश राणे यांना तेलंगणा सरकारचा मानाचा “यंग इंजिनिअर ऑफ द इयर २०२०” पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्या मूळच्या जळगाव येथील रहिवासी आहेत.
जागतिक अभियंता दिनाचे औचित्य साधत द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स, तेलंगणा राज्य केंद्र आणि तेलंगणा सरकारने नुकतेच दोन शास्त्रज्ञांना गौरविले. त्यात भारतीय रासायनिक प्रौद्योगिकी संस्थान (सीएसआयआर) च्या वैज्ञानिक डॉ. अलका निलेश राणे यांना देखील गौरविण्यात आले. महाराष्ट्रातून त्या एकमेव पुरस्कारार्थी आहेत. प्रसंगी तेलंगणाचे राज्यपाल सौ. तामिलीसाई सौदराराजन यांची उपस्थिती होती.
डॉ. अलका राणे या मूळच्या जळगाव येथील असून विनायक मेडिकलचे संचालक मधुसूदन विजय राणे यांचे बंधू निलेश राणे यांच्या पत्नी होत. तर डॉ. अलका राणे यांचे पती निलेश राणे हेदेखील मुंबई येथील संस्थेत वैज्ञानिक असून उत्तम संशोधक आहेत. डॉ. अलका राणे यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे जळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. डॉ. राणे मिळालेल्या पुरस्कारामुळे त्यांचे अनेक मान्यवरांनी कौतुक केले आहे.