जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रेमंड कंपनीतील कर्मचार्यांना गेल्यावेळेस पेक्षा कमी वेतनवाढ दिल्यामुळे कर्मचार्याांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. यामुळे रेमंड कंपनीच्या आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने याठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
एमआयडीसी परिसरातील रेमंड कंपनीकडून वेतनवाढ करण्यात आली आहे. परंतु गेल्या चार वर्षांपुर्वी झालेल्या वेतनवाढीच्या तुलनेत यंदा त्यापेक्षा कमी वेतनवाढ झाली आहे. शनिवारी दुपारी वेतनवाढ संदर्भात कंपनीच्या बोर्डवर नोटीस लावण्यात आली होती. परंतु कंपनीकडून करण्यात आलेली वेतनवाढ ही यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत अधिक होण्यापेक्षा कमी झाल्याने कर्मचार्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण होवून त्यांनी शनिवारी सायंकाळपासून कामबंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे कामावर आले. परंतु कंपनीच्या व्यव्स्थापनाने त्यांना आत प्रवेश दिला नसल्याने अनेक कर्मचारी माघारी निघून गेले तर काहींनी कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ ठिय्या मांडला होता. याठिकाणी कुठल्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून येथे पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.