पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील सावखेडा बु वीरजवान मंगलसिंह जयसिंह परदेशी यांच्या कुटुंबीयांची पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी भेट घेवून सांत्वन केले.
जवान मंगलसिंह परदेशी यांना १४ नोव्हेंबर रोजी पठाणकोट येथे कर्तव्यावर असताना छातीत गोळी लागल्याने वीरमरण आले. त्यांच्या पार्थिवावर दि. १६ नोव्हेंबर रोजी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर १८ रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सावखेडा येथे जावून परदेशी कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी परदेशी कुटुंबीयांची आस्थेने विचारपूस केली. तसेच नियमाप्रमाणे मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे सांगितले. यावेळी ना. गुलाबराव पाटील यांनी वीरजवान मंगलसिंग परदेशी यांचे आई, वडील, भाऊ, पत्नी, मुलगा – मुलगी यांचे सांत्वन केले. परदेशी कुटुंबाच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी आमदार किशोर पाटील व लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ उपस्थित होते.