वीज कायदा विरोधात कामगारांचे निदर्शन आंदोलन (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी  ।  केंद्र सरकारने वीज कायदा २०२१ विधेयक संसदेत मंजूर केला असून या विरोधात नॅशनल कोआॉर्डीनेशन कमिटी आॅफ ईलेक्ट्रीसिटी एम्प्लॉइज अॅन्ड इंजिनिअर्स असोशिएनतर्फे महावितरण परिमंडळ कार्यालयासमोर निदर्शने करून निषेध व्यक्त करण्यात आला.  

 

आज दि. १९ जुलै  रोजी  केंद्र सरकारच्या वीज कायदा २०२१ विधेयक संसदेच्या सुरु असलेल्या सत्रात मंजूरी करून सार्वजनिक मालकीचा वीज उद्योग अनेक तुकडे करून खाजगी भांडवलदारांच्या घशात घालण्याचा कुटील डाव हाणून पाडण्यासाठी व विरोध व निषेध नोंदवण्यासाठी देशभरात वीज कंपन्यांचे प्रमुख कार्यालयांसमोर निदर्श़ने करण्यात आली. त्याचा एक भाग म्हणून जळगाव येथे औद्योगिक वसाहतीमधील महावितरण परिमंडळ कार्यालयासमोर निषेध नोंदविण्यात आला.  या सभेत महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेचे परिमंडळ सचिव कॉ.विरेंद्र पाटील यांनी केंद्र शासनाच्या सार्वजनिक क्षेत्रातील जनतेच्या मालकीचे सुस्थितीत असलेले  उद्योग, खाजगी भांडवलदारांना विक्री करण्याचा व जनतेच्या मालकीच्या वीज उद्योग व सार्वजनिक असलेल्या वीज कंपन्यांचे अनेक तुकडे करून खाजगीकरण करून वीज उद्योगातील कामगार, कर्मचारी ,अधिकारी अभियंते यांना देशोधडीला लावण्याचा कुटील डाव हाणून पाडण्यासाठी संघटनेचे केंद्रीय नेतृत्वाने केलेल्या आवाहनानुसार पुढील सर्व लढ्यासाठी सक्रीय व सज्ज राहावे. तसेच १० अॉगष्ट २०२१ रोजी देशव्यापी संपात सहभागी व्हावे असे आवाहन केले. महिला  केंद्रीय कार्यकारिणी सदस्या कॉ. संध्या पाटील यांनी खाजगीकरण व फ्रैंचाइसीकरण झाल्यास आपला वीज उदयोगातील रोजगार सुरक्षित राहील की नाही याची शाश्वती नसून वेळीच धोका ओळखून या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. सर्कल अध्यक्ष जळगाव  कॉ. दिनेश बडगुजर यांनी केंद्र सरकार धडाधड जनतेच्या मालकीचे उद्योग विक्री करुन सरकारी यंत्रणा खिळखिळी करण्यात पूर्णपणे गतिमान असून वीज उद्योग विधेयक २०२१ ला आपला तीव्र विरोध असल्याचे मत व्यक्त केले. प्रास्ताविक करतांना विभागीय सचिव जळगाव कॉ.मुकेश बारी यांनी सांगितले की, वीज गळती व वीज चोरी यावर ठोस उपाय योजना न करता उद्योगाचे खाजगीकरण व फ्रैंचाईसीकरण करण्याचे या पूर्वी फसलेले अघोरी उपायांचे प्रयोग केंद्र सरकार करायला निघाले असून त्याचा तीव्र विरोध करीत आहोत .भविष्यात सर्व लढ्यासाठी सहभागी राहू अशी ग्वाही दिली. याप्रसंगी विभागीय अध्यक्ष जळगाव  कॉ. प्रभाकर महाजन, कॉ. गणेश बाविस्कर, कॉ. मंगेश बोरसे, कॉ. गणेश शेंडे, कॉ. स्वप्निल बडगुजर, कॉ. समाधान पाटील, कॉ.किशोर सपकाळे, कॉ. महेश बिचवे, कॉ. विजय टोकरे, कॉ. किशोर जगताप, कॉ. राहुल साळुंखे, सभासद बंधु उपस्थित होते.

 

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/806490856730751

 

Protected Content