सावदा, प्रतिनिधी । सावदा नगरपरिषदच्या वाढीव हद्दीतील नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यात याव्यात अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा नगरसेविका विजया कुशल जावळे, मीनाक्षी राजेश कोल्हे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
सावदा शहराची नवीन हद्दवाढ शासनाने यापूर्वीच मंजूर केलेले आहे. त्यातील सोमेश्वर नगर, धान्य मार्केट मागील परिसर आदी भागात गेल्या कित्येक वर्षांपासून रहिवास करीत असलेल्या नागरिक रस्ते, सांडपाण्याच्या गटारी, पथदिवे, कचरा संकलन या नागरी सुविधांपासून वंचित आहेत. दरम्यान, सदरील भाग २ वर्षापूर्वीच्या शहर हद्दीत समाविष्ट झालेला आहे. त्यामुळे वरील सुविधा मिळणे जरुरीचे होते. मात्र, अद्याप प्राथमिक सोयी सुविधा मिळालेल्या नाहीत. या परिसराच्या विकासासाठी नगरपरिषदेचे उदासीन धोरण आहे. या भागातील नागरिकांच्या समस्या दिवसेंदिवस जटिल बनले असून तात्काळ सोडविणे गरजेचे आहे. पालिकेने नव्याने घेतलेल्या विकास कामांमध्ये जाणीपूर्वक या भागाला वंचित ठेवलेले आहे. लवकरात लवकर नागरी सुविधा न मिळाल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. यासोबतच पालिकेतील सत्ताधारी गटाने आमच्या मतांचे राजकारण चालवलेल्या आमच्या भावनांचा खेळ थांबवावा अशी विनंती करण्यात आली आहे. प्रमुख मागण्या या भागात अनियंत्रित कमी-अधिक प्रमाणात होणारा पाणीपुरवठा, त्यादृष्टीने नव्याने पाईपलाईन टाकून मिळावी. संपूर्ण भागात रस्त्याचे खडीकरण व पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारीत बांधून मिळाव्यात संपूर्ण कॉलनी परिसरात पथदिव्यांची व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात आली आहे.