जळगाव प्रतिनिधी । येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते, युवा पत्रकार विश्वजीत चौधरी यांना सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल यशवंत फाउंडेशन संचलित चेतना व्यसनमुक्ती केंद्राचा ‘युवा चेतना पुरस्कार’ नुकताच प्रदान करण्यात आला.
स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीदिनी तसेच राष्ट्रीय युवा दिनाला हा पुरस्कार विश्वजित चौधरी यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते व कॅप्टन मोहन कुलकर्णी, उद्योजक जितेंद्र ढाके, डॉ. ए. एन. चौधरी, बालकल्याण समिती अध्यक्ष वैजयंती तळेले, डॉ. कांचन नारखेडे, क्रीडा शिक्षक प्रवीण पाटील, समुपदेशक नितीन विसपुते यांच्या उपस्थितीत देण्यात आला.
कोरोना काळात जून महिन्यापासून त्यांनी कोरोना रुग्णालयात, सामाजिक क्षेत्रात माहिती संकलन करीत निष्पक्ष वार्तांकन करणं, त्याचबरोबर कोरोनाविषयी नागरिकांना अचूक माहिती पोहोचविणे हे महत्त्वाचं काम केलं आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून देखील ते कार्यरत आहेत. कोरोना काळात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत असलेल्या 25 नागरिकांना हलाखीच्या काळात विविध संस्थांच्या माध्यमातून किराणा पुरवठा करून दिला आहे. सध्या ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जनसंपर्क सहाय्यक म्हणून रुग्णसेवा करीत आहेत.