जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । विवेकानंद नगरातील एका रूग्णालयाच्या इमारतीमध्ये लिफ्ट उभारण्याच्या कामात डॉक्टाराची तीन लाखात फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबार येथील विरॉन लिफ्ट अॅण्ड सर्व्हीसेसचा प्रोप्रायटर विकेश पाटील व सेल्स इंजिनिअर ऋषिकेश पाटील अशी फसवणूक करणाऱ्यांची नावे आहेत. याबाबत माहिती अशी की, जिल्हापेठ पोलीस ठाण्यात डॉ. तुषार चंद्रकांत नेहते (रा. विवेकानंदनगर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. विवेकानंद नगर येथे डॉ.तुषार नेहते हे वास्तव्यास आहे. एप्रिल २०१८ मध्ये त्यांच्या रूग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने त्यांनी लिफ्ट उभारणीचे काम घेण्यासाठी नंदुरबार येथील विरॉन लिफ्ट सर्व्हीसेचा प्रोप्रायटर विकेश पाटील व सेल्स इंजिनिअर ऋषिकेश पाटील यांनी नेहते यांना संपर्क साधला होता. यासाठी दोघांनी नेहते यांना ४ लाख ८० हजार रूपयांचे कोटेशन दिले. त्यानुसार डॉ. नेहते यांनी ९० हजारांचा चेक अडव्हान्स दिला. त्यानंतर लिफ्टच्या कामाला सुरूवात झाली. पुन्हा पैशांच्या मागणीनुसार नेहते यांनी विकेश व ऋषिकेश यांना २५ जुलै २०१८ रोजी आगाऊ रक्कम म्हणून २ लाख ४६ हजार रूपये दिले. त्यानंतर लिफ्टचे काम करण्याची विनंती करूनही दोघांनी काम केले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर डॉ. नेहते यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी नंदुरबार येथील विरॉन लिफ्ट अॅण्ड सर्व्हीसेसचा प्रोप्रायटर विकेश पाटील व सेल्स इंजिनिअर ऋषिकेश पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि किशोर पवार करीत आहे.