जळगाव प्रतिनिधी । शासनाने स्वस्त धान्य दुकानदारांचा ५० लाखांचा विमा संरक्षण कवच द्यावे यासह विविध मागण्यांसाठी १ मे पासून रेशन दुकानदारांनी बेमुदत संप पुकारला आहे. या संपाबाबत आज बुधवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉप किपर्स फेडरेशन पुणे सलग्न जळगाव शहर व ग्रामीण रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पुरवठाअधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी सुभाष जैन,तुकाराम निकम,फिरोज पठाण ,शैलेश जैन, हेमरत्न काळुंखे, अतुल हराळ प्रताप बनसोडे तथा महासंघाचे जिल्हाध्यक्षअध्यक्ष सुनील जावळे, महेंद्र बोरसे, भागवत पाटील,सुनील अंभोरे उपस्थित होते. शासनाने स्वस्त धान्य दुकानदारांचा ५० लाखांचा विमा संरक्षण कवच द्यावे, कोरोनाचा संसर्ग पाहता धान्य वितरण करताना लाभार्थ्यांची बायोमेट्रिक सक्ती न करता दुकानदारांचेआधार प्रमाणित करून अन्न धान्य वाटपाची मुभा द्यावी, स्वस्तधान्य दुकानदारांना चतुर्थ श्रेणी कर्मचारीचा दर्जा द्यावा , वाढत्या महागाई पाहता कमिशन वाढवून द्यावे, थंब स्कॅनरला युएसबी मार्फत एक्सटेन्शन करुन मिळावे, अशा विविध मागण्याकरीता ऑल महाराष्ट्र रेशन दुकानदार फेडरेशनचे अध्यक्ष गजानन बाबर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक १ मे पासून पासून राज्यभरात राज्यव्यापी संप पुकारला आहे. जळगाव शहरातील तसेच तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार हे संपात सहभागी होणार आहेत. असे निवेदनात नमूद आहे. हे निवेदन आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांना देण्यात आले.