विवाह जुळवून देण्याच्या नावाखाली दीड लाखात गंडविले

चाळीसगाव प्रतिनिधी । एका तरूणीशी विवाह जुळवून देण्याच्या नावाखाली तालुक्यातील वडाळा वडाळी येथील तरूणाची दीड लाखांमध्ये फसवणूक झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील वडाळे येथील अंकुश भाऊसाहेब आमले (वय ३२) हा तरूण आई व भावासह शेती व्यवसाय करतो. अंकुशचे लग्नाचे वय झाल्याने आई व इतर नातेवाईक त्याच्यासाठी मुलगी शोधत होते. दरम्यान, औरंगाबाद येथील संगीता बाबुराव पाटील या महिलेशी त्यांचा संपर्क आला. तिने यासाठी पैसे लागणार असल्याचे सांगितले. त्यानंतर अंकुश नातेवाइकांसह ओझरला आला. तेथे संगीताने ममता नावाच्या एका मुलीशी ओळख करून दिली. अंकुशला मुलगी पसंत पडल्याने लग्नासाठी त्याने होकार दिला. मुलीकडील मंडळींनी दोन दिवसात लग्न लावून देवू असे म्हणत लग्नाच्या तयारीसाठी दीड लाख रूपये लागतील, असे सांगितले. हे दीड लाख संगीता जवळ दिले. संगीताने पैसे घेतल्यानंतर ती व तिच्या सोबतची एक महिला व अन्य लोक निघून गेले. दुसर्‍या दिवशी बस्ता असल्याने लग्नासाठी आलेली ममता ही मुलगी अंकुशचा मावसे यांच्याकडे ओझर येथे मुक्कामी होती.

दरम्यान, अंकुश व त्याचे नातेवाईक आणि ममता हे सर्व १२ डिसेंबरला दुपारी १ वाजता बस्त्यासाठी चाळीसगावात आले. नियोजीत वधूचे कापड दुकानातून कपडे घेतले. त्यानंतर तिच्यासाठी दागिने घ्यावयाचे असल्याने अंकुशची आई, बहिण आणि ममता असे सराफाकडे जात असताना ममता एका व्यक्तीबरोबर वाहनात बसून पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांना दिसून आले. यामुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला या तरुणीने खरे नाव रेशमा रफिक खान (रा. शहानगर, बीड बायपास, औरंगाबाद) व तिच्या सोबत असलेल्या व्यक्तीचे नाव अशोक कडू चौधरी (रा. कुंभारखेडा, ता. रावेर) असे असल्याचे त्यांनी सांगितले. तर संगीताबाईने यातील दीड लाख रूपये घेतल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

या प्रकरणी या प्रकरणी संगीता पाटील, अशोक चौधरी, संदेश राजेश वाडे, अकील खान, रेखाबाई (चिखली) स अन्य अनोळखी २ ते ३ जणांविरुद्ध फसवणुकीचा चाळीसगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content