जळगाव, प्रतिनिधी | शहरातील एका समाजाच्या जात पंचायतीने आणि जवळच्या नातलगांनी विवाहासाठी स्वीकार न केल्याने मानसिक धक्का बसून एका तरुणीने काल (दि.२३) आत्महत्त्या केल्याची घटना घडली. या घटनेनंतर त्या तरुणीवर घाई-गडबडीत अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर अयशस्वी ठरला. त्यानंतर त्या तरुणीचे शवविच्छेदन करण्यात आले आहे.
अधिक माहिती अशी की, रूपाली (नाव बदलेले) या तरुणीच्या आई-वडिलांनी आंतरधर्मीय प्रेमविवाह केला होता. त्यांना दोन मुली झाल्यानंतर, जवळच्या नातलगांनी तिच्या वडिलांचे पुन्हा स्वजातीतल्या मुलीशी दुसरे लग्न लावून दिले होते. दरम्यान, ही तरुणी सध्या १२ वीत असून ती आपल्या वडिलांच्या समाजातील तरुणाशी विवाह करू इच्छित होती. मात्र तिचे काही नातलग त्यासाठी तयार नव्हते. अशातच तिच्या नात्यातील दुसऱ्या काही लोकांनी माणुसकीच्या भावनेतून तिचा विवाह आपल्या जातीतील कोल्हापूर येथील तरुणाशी करण्याचे निश्चित केले होते. तरीही काही जवळचे नातलग व जात पंचायतीने त्यासाठी परवानगी न दिल्याने निराश होवून मनाने खचलेल्या या तरुणीने काल आपल्या राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्त्या केली.
तिच्या आत्महत्त्येनंतर नातलगांनी पोलिसांना न कळवता, जातपंचायतीकडे धाव घेतली. परिवाराकडून दंड स्वरुपात रक्कम घेवून तिच्यावर आज (दि.२४) परस्पर अंत्यसंस्कार करण्याची परवानगी जातपंचायतीने दिली. दरम्यान, पोलिसांच्या हस्तक्षेपाने तसा प्रयत्न यशस्वी झाला नाही, त्यानंतर त्या मुलीचे शवविच्छेदन करण्यात येवून पोलिसात तशी नोंद करण्यात आली आहे. घडलेला सारा प्रकार संशयास्पद आहे. याबाबत पोलिसांनी देखील तपास सुरू केला आहे. परंतु, नेमकी माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. दरम्यान, जाती-पातीची बुरसटलेली विचारसरणी अद्यापही समाजात खोलवर रुजलेली असल्याचे या घटनेनंतर स्पष्ट होत आहे.