विलगीकारणात घरी थांबूनही राहुल गांधी सरकारवर संतापले

 

 नवी दिल्ली : वृत्तसंस्था । कोरोना संसर्गाच्या विळख्यात सामान्य नागरिकांपासून नेत्यापर्यंत सर्वच अडकत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना देखील कोरोनाची लागण झालेली आहे. आता देखील त्यांनी गृह विलगीकरणात असूनही मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

 

“घरी विलगीकरणात आहे आणि सतत वाईट बातम्या येत आहेत. भारतात संकट केवळ कोरोनाचं नाही, केंद्र सरकारचे जनतेविरोधातील धोरण आहे. खोटे उत्सव व पोकळ भाषण नाही, देशाला तोडगा द्या.” असं राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे.

 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना संसर्ग झाल्यानंतर त्यांनी स्वत: ट्विट करत माहिती दिली होती. सौम्य लक्षणं आढळल्यानंतर चाचणी केली रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे त्यांनी म्हटले होते.  आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना त्यांनी नियमांचं पालन करण्याचे देखील आवाहन केले होते. पश्चिम बंगालमधील आपल्या सर्व सभा रद्द करत असल्याची घोषणा देखील केली होती.

 

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या लस धोरणावर देखील टीका केलेली आहे. केंद्र सरकारचे लस धोरण भेदाभेद करणारे असून धोरणामध्ये दुर्बल घटकांसाठी लशीची हमी देण्यात आलेली नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. दुर्बल घटकांना लशीची हमी नाही, केंद्र सरकारची भेदाभेद करणारी रणनीती आहे, वितरणाची रणनीती नाही, असे राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे.

 

“केंद्र सरकारची कोविड रणनीती – स्टेज १ – तुघलकी लॉकडाउन लावा, स्टेज २ – थाळी वाजवा, स्टेज ३ – प्रभूगान.” अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी मोदी सरकारवरच्या रणनीतीवर टीका देखील केलेली आहे.

 

“ना चाचण्या, ना रूग्णालयात बेड, ना व्हेंटिलेटर्स, ना ऑक्सिजन, लस देखील नाही. केवळ एक उत्सवाचे ढोंग आहे. पीएम केअर्स?” असं देखील या अगोदर राहुल गांधी यांनी ट्विट केलेलं आहे.

 

Protected Content