विभागीय आयुक्त कार्यालयाच्या मते भगत बालाणी हेच भाजपचे गटनेते ! : आरटीआयमधून मिळाली माहिती (व्हिडिओ)

जळगाव प्रतिनिधी | महापालिकेतील भाजपच्या गटनेतेपदाबाबत पेच सुरू असतांना विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात जळगाव महापालिकेतील भाजपचे गटनेते हे भगत बालाणी हेच असल्याची माहिती समोर आली आहे. आ. गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक अरविंद देशमुख यांना माहिती अधिकारातून हेच उत्तर मिळाले आहे. यामुळे आता गटनेतेपदावर भाजपचाच हक्क अससल्याचे भाजप पदाधिकार्‍यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.

 

याबाबत वृत्त असे की, यंदा मार्च महिन्याच्या अखेरीस झालेल्या महापौर आणि उपमहापौरपदांच्या निवडणुकीत भाजपमध्ये उभी फूट पडली. यात ३० नगरसेवकांनी शिवसेनेशी हातमिळवणी केल्याने जळगाव महापालिकेत सत्तांतर झाले. यात महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री सुनील महाजन तर उपमहापौरपदी भाजपच्या फुटीर गटाचे कुलभूषण पाटील यांची वर्णी लागली. यानंतर दोन्ही गटांनी आपणच भाजपचा अधिकृत गट असल्याचे दावे केले आहेत. तसेच एकमेकांना आपत्र करण्यात यावेत असे तक्रारी अर्जदेखील केले आहेत.

 

मध्यंतरी झालेल्या प्रभाग समितीच्या निवडणुकीसाठी बंडखोर गटातर्फे गटनेते म्हणून दिलीप पोकळे तर प्रतोद म्हणून कुलभूषण पाटील यांच्या नावाने व्हीप बजावण्यात आले होते. याचे पालन केले नाही म्हणून या गटाने मूळ भाजपच्या नगरसेवकांना अपात्र करण्यात यावे अशी मागणी करणारी तक्रार विभागीय आयुक्तांकडे केली होती. यावर निकाल देण्याआधी आयुक्तांनी गेल्या आठवड्यातच २७ नगरसेवकांना अपात्रतेच्या नोटीसा बजावल्या होत्या. यानंतर तीन नगरसेवकांनी घरवापसी करत पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला होता.

 

दरम्यान, आ. गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक तथा भाजप पदाधिकारी अरविंद देशमुख यांनी विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे माहितीच्या अधिकारात जळगाव महापालिकेतील भाजपच्या गटनेतेपदाबाबत विचारणा केली होती. यावर त्यांना काल अर्थात ११ ऑक्टोबर रोजी लेखी स्वरूपात उत्तर मिळाले असून यामध्ये भगत बालाणी हे भाजपचे गटनेते असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

 

उद्याच महापालिकेची महत्वाची सभा होणार असतांना आज भाजपने पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे. या पत्रकार परिषदेला याप्रसंगी पक्षाचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील, डॉ. राधेश्याम चौधरी, विशाल त्रिपाठी, जितेंद्र मराठे आदींची उपस्थिती होती. दरम्यान, या प्रकरणी अरविंद देशमुख यांनी कागदोपत्री भक्कम पुरावे जमा करून भाजपच्या बंडखोर गटाला धक्का दिला आहे.

 

आजच्या पत्रकार परिषदेत डॉ. राधेश्याम चौधरी यांनी महापालिकेतील सत्ताधारी आणि भाजपचे फुटीर सदस्यांवर टीका केली. आजवर आम्हाला ३० नगरसेवकांचा पाठींबा होता. यानंतर तीन जण सोबत आले. तर आज पुन्हा दोन जणांनी संमती दिल्यामुळे आता भाजपच्या ३५ सदस्यांनी संमतीने भगत बालाणी हेच भाजपचे गटनेते असल्याचे स्पष्ट झाले असल्याचा दावा डॉ. राधेश्याम चौधरी यांनी दिला. तर राज्यात सत्ता असूनही सत्तेचा गैरवापर करता येत नसल्याचा टोला देखील त्यांनी मारला. उद्याच्या महासभेच्या आधी आयुक्तांना आम्ही याबाबत माहिती दिली असून ही कागदपत्रे सुपुर्द केली असल्याची माहिती त्यांनी दिली. तर बंडखोरांना अपात्र करण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचेही ते म्हणाले.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/984881635408237

 

Protected Content