जळगाव, प्रतिनिधी । अंतिम वर्ष सोडून इतर वर्षाचे निकाल मूल्यमापन करून जाहीर करण्यास विद्यापीठाने सुरुवात केली आहे. या निकाल संदर्भात विद्यार्थ्यांना समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्या समस्या सोडवून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी विद्यापीठ विकास मंच व अभाविपच्या शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ. पी.पी.पाटील यांच्या कडे केली.
लॉकडाउनमुळे ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरता आला नाही अशा विद्यार्थ्यांना विद्यापीठाने परीक्षा अर्ज भरण्याची मुदत वाढ दिली. परंतु, तोपर्यंत विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण विद्यापीठाकडे पाठवण्याची तारीख संपली असल्याने त्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण महाविद्यालयाने पाठवून देखील विद्यापीठ प्रशासन ते स्वीकारू शकले नाही. तरी त्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण स्वीकारून व त्यांचा सुधारित निकाल लवकरात लवकर जाहीर करण्यात यावा अशी मागणी यावेळी केली असता कुलगुरू डॉ. पाटील यांनी आम्ही पुनर्विचार करू असे आश्वासन दिले. तसेच पदवी व पदव्युत्तरच्या अंतिम वर्षाच्या निकाल विषयात राज्य सरकारने निर्णय जाहीर केला आहे. त्यात विद्यापीठ प्रशासनाने कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. त्यातच ATKT च्या विषयांचे प्रश्न संभ्रम वाढवत आहेत. तरी संदर्भात लवकरात लवकर विद्यापीठाची भूमिका जाहीर करावी, अभियांत्रिकीची नोव्हेंबर २०१९ परीक्षेची फोटोकॉपी व रीचेकिंगची प्रक्रिया सुरू आहे. परंतु काही महाविद्यालय विद्यापीठ परिपत्रकानुसार स्पीड पोस्टने उत्तरपत्रिका पाठवत नाही. तरी फोटोकॉपी स्पीड पोस्ट करण्याची अंतिम तारीख निश्चित करून द्यावी व रीचेकिंग सुरू ठेवण्याचीही प्रक्रिया सुरू ठेवावी अशी मागणी करण्यात आली. विद्यापीठ परिसरातील वसतिगृहात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी क्षमता लक्षात घेता पर्यायी व्यवस्था विद्यापीठाने उपलब्ध करण्याच्या दृष्टीकोनातून उपाययोजना करावी. विद्यापीठ परिसरामध्ये विविध प्रशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरण्याचे राहिली असल्यास अशा विद्यार्थ्यांना प्रत्यक सत्रानुसार लागणारा ५०० रुपये दंड आकारण्यात येऊ नये. आत्तापर्यंत शिल्लक असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची शैक्षणिक शुल्काची मूळ रक्कम जमा करून घ्यावी, इतर कोणत्याही प्रकारच्या दंड आकारण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात आली.
कोरोना महामारी मुळे विद्यार्थी, शिक्षक, पालक व याचप्रमाणे संपूर्ण शैक्षणिक परिवारात भीतीचे वातावरण आहे. तरी विद्यापीठाने पालक या भूमिकेतून ठोस उपाय योजना कराव्यात, शैक्षणिक वर्ष २०२०-२१ ची प्रवेश प्रक्रिया काही महाविद्यालयांनी जाहीर केली आहे. तरी प्रवेश प्रक्रिया, शैक्षणिक शुल्क, अध्यापन प्रक्रिया याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. तरी विद्यापीठाने या संदर्भात भूमिका जाहीर करावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. या प्रश्नांवर सकरात्मक चर्चा केली व सदर समस्यांवर लवकरच निर्णय घेऊ असे आश्वासन अभाविप व विद्यापीठ विकास मंचच्या शिष्टमंडळाला कुलगुरूंनी दिले. शिष्टमंडळात व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप रामू पाटील, दिपक पाटील, अधिसभा सदस्य व विभाग प्रमुख वि. वि. मंच नितीन ठाकूर, अमोल मराठे, अभाविप प्रदेश सहमंत्री विराज भामरे, सिद्धेश्वर लटपटे, महानगरमंत्री रितेश चौधरी यांचा समावेश होता.