जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खान्देशातील क्रांतीकारकांचे भारतीय स्वातंत्र्य लढयातील योगदान अंबापाणी येथील युध्द, चिमठाणा येथील आदिवासींचा लढा या व अशा काही उदाहरणावरुन दिसून येते असे प्रतिप्रादन प्राचार्य डॉ. बी.एन. पाटील यांनी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्र आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त डॉ. पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रा. पाटील यांनी सांगितले की, प्रारंभीच्या काळात भिल्ल जमातीतील क्रांतीकारक गुमानसिंग नाईक, काझीसिंग नाईक यांनी सरंजामशाही विरूध्द लढत स्वातंत्र्याची मशाल पुढे नेली. अंबापाणीच्या लढयात खान्देशातील महिलांनी क्रांतीकारकांना भाकरी पुरूवून योगदान दिले. जल, जंगल आणि जमीन यावर कोणालाही ताबा मिळवू देणार नाही या भूमिकेतून क्रांतीकारक लढले. चहार्डी खजीना लूट, चिमठाणा खजीना लूट या संबंधीत त्यांनी विवेचन केले.
प्रा. एस.टी. इंगळे म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्याचा लढा हा आपलया सगळ्यांसाठी अस्मितेचा भाग आहे. खान्देशातील क्रांतीकारकांचे योगदान नव्या पिढीने समजून घेतले पाहिजे. प्रशाळाच्या संचालक प्रा. मुक्ता महाजन यांनी नव्या पिढीला मागचा इतिहास समजावा म्हणून असे क्रायर्कम घेत असल्याचे सांगितले. अध्यक्षीय समारोप डॉ. ए.पी. पाटील यांनी केला. कार्यक्रमाच सूत्रसंचालन सुनील अहिरे यांनी केले.