जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागातर्फे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्ताने वाचन प्रेरणा दिनानिमित्त व्याख्यान व निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले आहे.
विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागात १५ ऑक्टोबर रोजी विचारधारा प्रशाळेचे प्रभारी संचालक प्रा. म.सु.पगारे यांनी व्याख्यानात सांगितले की, आजचा विचार करता इंटरनेट व मोबाईलच्या वापरामुळे वाचन संस्कृती लयाला जाऊ पाहत आहे. माणसाने ज्ञान अर्जित करण्यासाठी वाचत राहिले पाहिजे. अध्यक्षस्थानी विभाग प्रमुख डॉ.मनिषा इंदाणी होत्या. याच कार्यक्रमात शिक्षक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विजेते प्रथम क्रमांक नयना गवळे, समाजशास्त्र प्रशाळा, व्दितीय क्रमांक पठाण सामिया खानम जुबेर अहमद, व तृतीय क्रमांक धनश्री महाजन दोघेही संख्याशास्त्र प्रशाळा, उत्तेजनार्थ प्राजक्ता राजपूत भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्र व ट्विंकल वनकर, पर्यावरणशास्त्र व भूविज्ञान प्रशाळा यांना पारितोषिके वितरित करण्यात आली. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ.रणजित पारधे यांनी करुन दिला. विद्यार्थी स्वप्नील पाटील, रुपाली पाटील, कांचन मिश्रा आणि मोनिका सोळंके यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सविता अहीरराव तर आभार स्नेहा पवार यांनी मानले.