जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या १५ अभ्यासमंडळांच्या सोमवारी १० एप्रिल रोजी बैठका झाल्या यामध्ये तीन अभ्यासमंडळांच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणूकीत डॉ. गुणवंत सोनवणे, डॉ. मनोजकुमार चोपडा आणि डॉ. मधुकर पाटील हे अनुक्रमे रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र विषयाच्या अध्यक्षपदी निवडून आले. तर उर्वरित १२ अभ्यासमंडळांचे अध्यक्ष बिनविरोध निवडून आले आहेत.
एकूण २५ अभ्यासमंडळांच्या निवडणूकांचा कार्यक्रम विद्यापीठाने यापूर्वीच जाहीर केला होता. १० एप्रिल रोजी १५ अभ्यासमंडळांच्या बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी व प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे यांनी अभ्यासमंडळांच्या सदस्यांना संबोधित केले. नवीन शैक्षणिक धोरणांच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने अभ्यासमंडळांची जबाबदारी अधिक वाढली असून देशपातळीवर आपल्या विद्यापीठाचा विद्यार्थी अभ्यासक्रमात मागे राहणार नाही याची काळजी अभ्यासमंडळांनी घेण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांमध्ये असलेली उदासिनता दूर करावी लागेल असे प्रा. माहेश्वरी म्हणाले. तर प्र-कुलगुरू प्रा. इंगळे म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरण डोळ्यासमोर ठेवून अभ्यासक्रम तयार करावेत. निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी ज्या अभ्यासमंडळाची निवडणूक होणार होती त्याची माहिती दिली. निवडून आलेल्या अध्यक्षांना कुलगुरू व प्र-कुलगुरूंच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी निवडणूक कक्ष प्रमुख इंजि. आर.आय.पाटील, डॉ. मुनाफ शेख, फुलचंद अग्रवाल, आधार कोळी, प्रवीण चंदनकर आदी उपस्थित होते.
सकाळच्या सत्रात विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखांच्या अभ्यासमंडळांच्या बैठका झाल्या. रसायनशास्त्र अभ्यासमंडळासाठी प्रा. दीपक दलाल (रसायनशास्त्र प्रशाळा, विद्यापीठ) आणि डॉ. गुणवंत सोनवणे (किसान महाविद्यालय, पारोळा) हे दोन उमेदवार उभे होते. झालेल्या निवडणूकीत डॉ. सोनवणे यांना सहा तर प्रा. दलाल यांना चार मते प्राप्त झाल्यामुळे डॉ. सोनवणे यांना विजयी घोषित करण्यात आले. प्राणीशास्त्र विषयासाठी झालेल्या निवडणूकीत डॉ. मनोजकुमार चोपडा (मु.जे. महाविद्यालय, जळगाव) व डॉ. प्रवीण महाजन (ऐनपूर महाविद्यालय, ऐनपूर) या दोन्ही उमेदवारांना समसमान चार मते पडली चिट्टी द्वारे डॉ. चोपडा यांना विजयी घोषित करण्यात आले. वनस्पतीशास्त्र अभ्यासमंडळाच्या निवडणूकीसाठी डॉ. किशोर बोरसे (एस.एस.व्ही.पी.एस. महाविद्यालय, धुळे) व डॉ. मधुकर पाटील (जिजामाता महाविद्यालय, नंदुरबार) हे दोन उमेदवार उभे होते. डॉ. पाटील यांना सहा तर डॉ. बोरसे यांना दोन मते प्राप्त झाली. डॉ. पाटील यांना विजयी घोषित करण्यात आले. आचारसंहिता भंगाबाबत डॉ. बोरसे यांनी केलेली तक्रार विद्यापीठाने अमान्य केली.
उर्वरित अभ्यासमंडळांचे बिनविरोध निवडून आलेले अध्यक्ष पुढीलप्रमाणे :
गणित – प्रा. जयप्रकाश चौधरी (मु.जे. महाविद्यालय, जळगाव), २) भौतिकशास्त्र – प्रा. जयदीप साळी (भौतिकशास्त्र प्रशाळा विद्यापीठ), ३) संगणकशास्त्र – प्रा. सतिष कोल्हे (संगणकशास्त्र प्रशाळा विद्यापीठ), ४) इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड इन्स्ट्रुमेंटेशन – प्रा. ए.एम. महाजन (भौतिकशास्त्र प्रशाळा विद्यापीठ), ५) भुगोल – डॉ. सुरेश शेलार (गंगामाई महाविद्यालय, नगाव), ६) फार्माकॉलॉजी – डॉ. रवींद्र पाटील (अजमेरा फार्मसी महाविद्यालय, धुळे), ७) फार्मास्युटीक्स – डॉ. हितेंद्र महाजन (आर.सी. पटेल फार्मसी महाविद्यालय, शिरपूर), ८) फॉर्मास्युटीकल केमिस्ट्री – डॉ. राजेश चौधरी (फार्मसी महाविद्यालय, फैजपूर), ९) बिझिनेस अॅडमिनिस्ट्रेशन – डॉ. आर.आर. चव्हाण (व्यवस्थापन शास्त्र प्रशाळा विद्यापीठ), १०) कॉमर्स अॅण्ड बिझीनेस लॉ – डॉ. पवित्रा पाटील (व्यवस्थापन शास्त्र प्रशाळा विद्यापीठ), ११) कॉम्प्युटर मॅनेजमेंट – डॉ. राहुल कुलकर्णी (बी.पी. कला व वाणिज्य महाविद्यालय, चाळीसगाव), १२) अकौंटींग अॅण्ड कॉस्टींग – तदर्थ अध्यक्ष डॉ. सचिन जाधव (शिंदखेडा महाविद्यालय, शिंदखेडा).
उद्या दिनांक ११ एप्रिल रोजी मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, संरक्षणशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि शिक्षणशास्त्र या अभ्यासमंडळांच्या बैठका होणार आहेत.