चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील विटनेर येथे कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून गावात सर्वत्र सॅनिटाझर, टीसीएल, सोडियम हायड्रोक्लोराईड पाण्यात मिसळून फवारणी करण्यात आली. गावातील गटार, सार्वजनिक मुतारी व शौचालय येथे कीटकनाशक, जंतूनाशक फवारणी करण्यात आली.
यासाठी ग्रामपंचायत, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी कोतवाल यांनी पुढाकार घेतला. गावातील मुख्य रस्त्यावर, गल्लीबोळात ही फवारणी करण्यात आली तसेच नागरिकांना कोरोना पासून बचाव करण्यासाठी आपण घरातच राहावे, अशा सूचना देखील वेळोवेळी ग्रामपंचायतमार्फत नागरिकांना देण्यात येत आहेत.
आपल्या घरी किंवा गावात पुणे, मुंबई, नासिक अन्य शहरातून व्यक्ती आल्यास तात्काळ ग्रामपंचायतीला कळवावे. गावात गल्लीबोळात झालेल्या फवारणीने गावकऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. कोरोना रोगाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात अन्यत्र भागात दिसून येत असतांना विटनेर गावाच्या ग्रामसेविका व तलाठी दिवसभर गावातच ठाण मांडून आहेत. यावेळी सरपंच प्रभाबाई कोळी यांनी सांगितले की, गावात १४ एप्रिलपर्यंत अशाच पद्धतीने फवारणी केली जाईल. यावेळी सरपंच प्रभाबाई कोळी, ग्रामसेविका कल्याणीताई पाटील, पोलीस पाटील भाऊसाहेब पाटील, तलाठी एल.बी. हिंगे, कोतवाल भावलाल कोळी, योगेश कोळी, ग्रामपंचायत कर्मचारी कुलदीप कोळी यांनी अथक परिश्रम घेतले.